नंदुरबार l प्रतिनिधी
रशिया व युक्रेन या देशात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून युक्रेनमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील जे नागरीक व विद्यार्थी अडकले असतील त्यांच्या नातेवाईकांनी जवळच्या तहसिल कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले होते.त्यानुसार अद्यापपावेतो युक्रेनमध्ये असणाऱ्या नऊ विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क केला आहे.
सद्यस्थितीत रशिया आणि युक्रेनमध्ये तणाव परिस्थिती निर्माण झाल्याने तेथे अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.त्यानुसार नंदुरबार जिल्हा प्रशासनाने संपर्काचे आवाहन केले होते.नंदुरबार जिल्ह्यातील नऊ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून त्यांच्या नातेवाईकांनी प्रशासनाशी संपर्क साधला.जिल्हा प्रशासनाने सदर विद्यार्थ्यांची नावासह यादी शासनास सादर केली असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.अद्यापही युक्रेनमध्ये अडकलेल्या नातेवाईक अथवा विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी संपर्क करुन जिल्हा प्रशासनास माहिती द्यावी. जेणे करुन युक्रेनमध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित परत आणण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.








