नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील गांधी पुतळा चौकात जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय भाजप सरकार विरोधात जोरदार निदर्शने करत निषेध करण्यात आला.

यावेळी माजी आमदार व शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी, काँग्रेस जिल्हा कार्यकारी अध्यक्ष दिलीप नाईक, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजित मोरे व महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी कडून कवडीमोल भावाने जमिनी विकत घेतल्या प्रकरणात केंद्र सरकारच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीने चौकशी करून अटक केल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजपा हमसे डरती है ईडी को आगे करती है. केंद्र सरकारचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या. नवाब मलिक तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथ है. अशा आशयाचा घोषणा देऊन केंद्रीय भाजप सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. एकूणच गेल्या काही काळापासून केंद्रीय भाजप सरकारने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे ईडी द्वारे चौकशी सुरू केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.








