नंदुरबार l प्रतिनिधी-
मित्राच्या लग्नाला आलेल्या विदेशी पाहुण्यांनी बँड पथकाच्या तालावर नृत्य करीत ताशे वाजवून धूम केली. ‘मेरे यार की शादी’ असल्याने दोघा पाहुण्यांनी हातावर मेंदी रेखाटून भारतीय संस्कृतीशी एकरूप झाले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत त्यांनी ठाणेपाडाच्या जंगलात जाऊन निसर्गाचा खराखुरा आनंद उपभोगला.
नंदुरबार येथील सहारा टाऊन परिसरात राहणारे अमर पाबळकर यांच्या शुभविवाह नुकताच पार पडला. अमर पाबळकर हे जर्मनीतील फ्रेंक फ्रूट शहरात रोजगार निर्मितीचे कार्य करीत आहेत. त्यांनी स्वतःची एच.एस पर्सना जीएमबीएच कंपनी असून, आतापर्यंत शेकडो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांच्या कंपनीमध्ये जर्मनीतील फ्रेंड फ्रुट येथील रहिवासी लिएन्डर त्यांचा पार्टनर आहे तर दक्षिण अमेरिकेतील रोनाल्ड हा सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम काम करतोय.
मित्र अमरच्या लग्नाला आलेल्या लिएन्डर,रॉनाल्ड यांनी तालुक्यातील विविध भागांना त्यांनी भेटी दिल्या जिल्ह्यातील आदिवासी परंपरा संस्कृती व भाषेबद्दल त्यांनी माहिती जाणून घेत समाधान व्यक्त केले. भेटी दरम्यान अनेक ठिकाणी त्यांनी स्वतःहून नमस्कार करून ग्रामस्थांना अभिवादन केले. अनेकांनी त्यांच्या सोबत मोबाईलमध्ये सेल्फी काढली.
पारंपरिक स्वागताने भारावले
नंदूरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथील जंगलात त्यांनी भेट दिली. गावातील अरूण सुर्यवंशी यांच्या शेतात जाऊन त्यांनी पेरलेल्या पिकांची माहिती घेतली. यावेळी कोकणी आदिवासी महिलांनी त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.त्यानंतर शेतातील झोपडीवर काही काळ थांबून शेतीपयोगी माहिती जाणून घेतली.येथील शेतकरी शेतात मोठ्याप्रमाणावर मेहनत घेत असतात शेती करणे फार कष्टाचे काम असल्याचे लिएन्डर,रॉनाल्ड त्यांनी सांगितले.