नंदुबार | प्रतिनिधी-
शहादा तालुक्यातील कळंबू गावाचे सुपुत्र व कै.अशोक जगन्नाथ महाजन यांचे चिरंजीव निलेश अशोक महाजन यांना काल दि.२४ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास गुवाहाटी येथे वीरमरण आले. आठ महिन्यांपुर्वी मणिपूर येथे कर्तव्य बजावत असतांना गोळी लागून ते गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, दि.२७ जुलै रोजी सोनगीर ता.धुळे येथील राहत्या घरापासून त्यांची लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कळंबू ता.शहादा येथील निलेश अशोक महाजन हे भारतीय सैन्यात कार्यरत होते. मणिपूर येथे कर्तव्य बजावत असतांना दि.६ नोव्हेंबर २०२० रोजी गोळी लागून ते गंभीर जखमी झाले होता. सहकार्यांच्या मदतीने गुवाहाटी येथे दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या आठ महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू असतांना काल दि.२४ जुलै रोजी रात्री आठ वाजता प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना वीरमरण आले. शहिद निलेश यांचे बालपण व शिक्षण कळंबू येथे झाले होते. वडील व लहान काका सैन्यदलात असल्याने त्यांना देशसेवा करण्याची लहानपणापासून आवड होती. मात्र काही कळण्याअगोदरच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर काही वर्षांनी आईचेही निधन झाल्याने तिघा भावंडांचा आधार गेला. अतिशय कमी वयात त्यांच्या आईवडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर दोघा भावंडांनी निलेशच्या शिक्षणासाठी मदत केली. निलेश यांचे प्राथमिक शिक्षण कळंबू येथील जि.प. मराठी शाळा, पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण येथील डी. जी. बी. शेतकी विद्यालयात झाले. पुढे दोंडाईचा येथील दादासाहेब रावल कॉलेज येथे एन.सी.सी. च्या तीन वर्षांच्या शिक्षणानंतर नांदेड येथे आर्मी पायु मराठा युनिटमध्ये २०१६ मध्ये कमी वयात २१ व्या वर्षी भरती झाले. त्यानंतर १ सप्टेंबर २०१६ रोजी बेळगांव (कर्नाटक) येथे पुढील प्रशिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला दिल्ली येथे ते रुजू झाले. त्यानंतर मणिपूर येथे सेवा बजावली. पाच ते साडेपाच वर्षाची सेवा बजावल्यानंतर दि.६ नोव्हेंबर २०२० रोजी कर्तव्यावर असतांना त्यांना गोळी लागल्याने ते जखमी झाले होते. सहकार्यांच्या मदतीने त्यांना गुवाहाटी येथे दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या आठ महिन्यापासून त्यांच्यावर उपचार सुरू असतांना काल दि.२४ रोजी वयाच्या २६ व्या वर्षी वीरमरण आले. त्यामुळे कळंबू गावावर शोककळा पसरली आहे. निलेश यांच्या पश्चात एक विवाहित बहिण सीमा किशोर महाजन व मोठा भाऊ दिपक अशोक महाजन हा शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथील एम.आय.डी.सी. येथे सुदर्शन मिनरल सुपरवायझर या पदावर आहेत. ते धुळे तालुक्यातील सोनगीर येथे वास्तव्यास आहेत.
शाहिद निलेश यांचे पार्थिव गुवाहाटी येथून विमानातून आज रात्री उशिरापर्यंत धुळे येथे येण्याची शक्यता आहे. धुळे येथून दि.२७ जुलै रोजी शासकीय वाहनाने सोनगीर येथील राजकुमार नगरातील राहत्या घरून त्यांची अंत्ययात्रा शासकीय इतमामात काढण्यात येणार आहे. सोनगीर येथील दोंडाईचा रस्त्यावरील सोमेश्वर महादेव मंदिराजवळील स्वामी नारायण मंदिराच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, असे शहिद निलेशचे मोठे भाऊ दिपक महाजन व नातेवाईक शैलेश देवरे यांनी सांगितले.