नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार शहरातील सर्वात मोठे थकबाकीदार 50 खातेदारांदारांची फेब्रुवारी नंतर मालमत्ता जप्त करीत पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.या आर्थिक वर्षात नंदूरबार पालिकेची फक्त 15 टक्के वसुली झाली आहे.सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी नगरपालिका वसुलीचा आढावा घेतला वसुली असमाधानकारक असल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली.
दि. 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 5 वाजता भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी नगरपालिका सभागृहामध्ये सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी नगरपालिका वसुली विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचा आढावा घेतला यावेळी त्यांनी वसुली असमाधानकारक असल्यामुळे नाराजी व्यक्त केली. आर्थिक वर्ष 2021- 22 संपण्यासाठी केवळ एक महिना बाकी असताना नगरपालिकेची वसुली केवळ 15 टक्के असून शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात पाठपुरावा सुरू असल्यामुळे सर्व वसुली लिपिक यांनी दैनंदिन केलेल्या कामकाजाचा आढावा समक्ष दूरध्वनीद्वारे किंवा व्हाट्सअप द्वारे कळवावा, असे सूचित केले आहे.
यावेळी प्रभारी मुख्याधिकारी भाऊसाहेब थोरात यांनी मालमत्ता कर,पाणीपट्टी ,रोजगार हमी कर व शैक्षणिक कर यांचे उद्दिष्ट, मागणी आणि वसुली याबाबत सभागृहास माहिती दिली.

नंदूरबार शहरातील सर्वात मोठे थकबाकीदार 50 खातेदारांवर फेब्रुवारी महिना संपल्यानंतर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे, तसेच प्रसंगी पाणीपुरवठा देखील खंडित करण्यात येईल, असेदेखील नमूद केले.
मोठ्या रकमांची थकबाकी असलेल्या खातेदारांची नावे व पत्ते रकमांसह सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येतील असेदेखील सांगितले.
नगरपालिकेच्या गाळेधारकांकडुन देखील तातडीने वसुली करण्याचे निर्देश सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
नंदुरबार शहरातील मालमत्ताधारकांनी तातडीने मालमत्ता कर, पाणीपट्टी नगरपालिकेला भरणा करावी व अप्रिय कारवाई टाळावी, असे आवाहन प्रभारी मुख्याधिकारी यांनी केले आहे.बैठकीसाठी कार्यालय अधीक्षक श्री. गावित आणि वसुली निरीक्षक श्री.वसावे यांच्यासह सर्व वसुली लिपिक उपस्थित होते.








