तळोदा l प्रतिनिधी
स्वस्त धान्य दुकानातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना एक किलोच्या पॅकेटमध्ये साखर दिली जाणार असून लाभार्थ्यांना हक्काची साखर मिळणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी स्वस्त धान्यात आपली हक्काची साखर घेण्याचे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे. पुरवठा विभागाकडे साखर उपलब्ध झाल्याने तळोदा तालुक्यात १० हजार ८५२ अंत्योदय लाभार्थ्यांना हा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून स्वस्त धान्य दुकाने चालवली जातात. यात अंत्योदय लाभार्थी कुटुंब व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना स्वस्त धान्याचा लाभ दिला जातो. कोरोना काळात तर या लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर धान्याच्या लाभ मिळून जीवन जगण्यासाठी आधार मिळाला होता. आता शासनाने अंत्योदय कुटुंबा लाभार्थ्यांना दर महिना देण्यात येणारी एक किलो साखर पॅकिंगमध्ये देण्याच्या निर्णय घेतला आहे.
आतापावेतो लाभार्थ्यांना साखर देण्यासाठी स्वस्त धान्य दुकानांना साखरेची पोती दिली जात होती. मात्र पोत्यात साखर कमी भरण्याचे प्रमाण तर लाभार्थ्यांपर्यंत साखर कमी प्रमाणात पोहोचण्याचे प्रमाण राहत असल्याचे बोलले जात होते. या सर्व तक्रारींच्या निवारणासाठी शासनाने एक किलो पॅकिंग साखर पुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याने आता लाभार्थ्यांना पूर्ण एक किलो साखर पॅकिंग स्वरूपात मिळणार आहे.
तळोदा तालुक्यात अंत्योदय योजनेतील १० हजार ८५२ शिधापत्रिकाधारक लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना पॅकिंग मध्ये साखर देण्यासाठी पुरवठा विभागाकडे उपलब्ध झाली आहे. यामुळे अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांनी स्वागत केले असून समाधान व्यक्त केले आहे.