म्हसावद l प्रतिनिधी
पुणे येथील ‘एमआयटी’ शिक्षणसंस्थासमूहाचे कार्यकारी अध्यक्ष व ‘एमआयटी – स्कुल ऑफ गव्हर्नमेंट’ या आशिया खंडातील पहिल्या शिक्षण – प्रबोधन संकल्पनेचे प्रणेते राहुल कराड यांच्या विचार चिंतनातून ‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’ची स्थापना झाली आहे.
‘समर्थ सरपंच – समृद्ध भारत’ हे विचारब्रीद समोर ठेवून देशातील सरपंचांना अराजकीय स्वरूपात संघटित करणे,सर्वांगीण ग्रामविकासासाठी त्यांना प्रेरित करून त्यांचे प्रबोधन करणे व त्यांना त्यांची ग्रामविकासाची प्रक्रिया यशस्वी करण्यात विविध उपक्रमांचे अभ्यासपूर्वक आयोजन करून प्रत्यक्षपणे सहाय्यभूत होणे हे ‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’चे प्रमुख उद्दिष्ट आहे.देशभरात ग्रामविकास क्षेत्रात प्रत्यक्ष कार्य करीत असलेल्या कर्तृत्ववान सामाजिक कार्यवीरांचे नेटवर्क संघटित करून त्यांच्या समन्वय सहकार्यातून हे कार्य ‘एमआयटी – सरपंच संसद’ यशस्वी करीत आहे.
महाराष्ट्र राज्याच्या नंदुरबार जिल्ह्यात कार्यविस्तार करण्यासाठी ‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’ च्या नंदुरबार जिल्हा समन्वयकपदी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांची निवड करण्यात आली.
सारंगखेडा येथे रावल यांच्या चेतक फेस्टीव्हलचा कार्यालयात ‘एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’चे प्रमुख समन्वयक योगेश पाटील यांनी श्री.रावल यांना शाल व ‘एमआयटी – विश्वशांती घुमटा’ची प्रतिमा सन्मापुर्वक देऊन निवडीची घोषणा केली.’एमआयटी – राष्ट्रीय सरपंच संसदे’चे सहसमन्वयक प्रकाशराव महाले,सरपंच समन्वयक गोपालसिंग रावल व दोंडाईचाचे सामाजिक कार्यकर्ते नितीन काळकाटे हे यावेळी उपस्थित होते.