नंदुरबार l प्रतिनिधी
दिव्यांग व्यक्तींना सहाय्य करु इच्छिणाऱ्या समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक व सेवाभावी संघटनांकडून मदत मिळवून देण्यासाठी सेवाभावी संघटनांनी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी.जी.नादगांवकर यांनी केले आहे.
दिव्यांग व्यक्तींना त्यांचे जीवन जगणे सुलभ व्हावे यासाठी विविध सहायक उपकरणांची आवश्यकता असते. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक व सेवाभावी संघटना व दिव्यांगांना सुगम्यता प्राप्त करुन देण्यासाठी आवश्यक सहायक साधनांचा पुरवठा करीत असतात. मात्र दानशूर व्यक्तीं व दिव्यांग लाभार्थी यांच्यामध्ये संवाद साधला जात नसल्याने दिव्यांगांना आवश्यक असणाऱ्या सहायक साधनांची कमतरता भासते.त्यामुळे दिव्यांग व्यक्तींमध्ये जनजागृती करुन त्याची माहिती उपलब्ध करण्यासाठी व या दिव्यांगांना दानशूर व्यक्ती, सामाजिक व सेवाभावी संघटना यांचेकडून मदत मिळवून देण्यासाठी दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे व महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मुंबई यांच्या सयुक्तपणे ‘शरद’ अभियांन राबविण्यात येत आहे.
या अभियांनातर्गत दिव्यांग व्यक्तींना सहाय्य करण्यासाठी अधिकाधिक दानशूर व्यक्ती आणि सामाजिक व सेवाभावी संस्थांनी www.mahasharad.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. नोंदणीसाठी दिव्यांग व्यक्तींकडे केंद्र शासनाच्या वैश्विक ओळखपत्र प्रणाली अंतर्गत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच ज्या व्यक्ती आणि सामाजिक सेवाभावी संस्थांकडून सदर प्रणालीद्वारे मदत करण्यात करण्यात येईल त्यांना आयकरामध्ये 80 जी अंतर्गत सुट देण्यात येईल.