शहादा l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मंदाणे रस्त्यावरील सावखेडा गावाजवळील वळणावर महाराष्ट्रातून मध्यप्रदेशात जाणाऱ्या दुचाकीस्वारास समोरून येणाऱ्या एका टाटा सुमो गाडीने जोरदार धडक दिल्याने या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शहादा मंदाणे राज्य महामार्गावर शहाद्याकडून मध्यप्रदेशात दोन जण दुचाकी वाहनाने जात असताना सावखेडा गावाच्या पहिल्या वळणावर समोरून येणाऱ्या एका टाटा सुमो गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात कुमारिया डेडा वसावा (वय-48 पोलीस पाटील), मुआरी दगड्या पटले (वय-38) दोन्ही रा.खपाडा ता. वरला, जिल्हा बडवानी (मध्यप्रदेश)
या दोघांचा जागीच मृत्यू झाला.अपघात घडताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. त्यावेळी असलोद पोलिसठाणे दुरक्षेत्राचे हवालदार दीपक परदेशी,अमृत पाटील यांनीही घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले.मयत हे स्वतःचे दुचाकी वाहनासह अन्य एका बोलेरो गाडीने कुटुंबीयांसह देवमोगरा येथील मातेच्या दर्शनासाठी गेले होते. तेथून गुरुवार दि. 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मंदाणे मार्गाने मध्यप्रदेशात सेंधवाकडे जात असताना मयत हे दोघे जण दुचाकीवर होते. त्यांच्या पुढे कुटुंबीय असलेले बोलोरो गाडी जात होती त्याचवेळी समोरून येणाऱ्या एका सिल्व्हर रंगाच्या टाटा सुमो गाडीने जोरदार धडक दिली. घटनास्थळी अक्षरशः रक्ताचा सडा पडला होता.मयत झालेल्या दोघांना डोक्यास, तोंडाला गंभीर जखमा झाल्या.मृतदेह शवविच्छेदनासाठी म्हसावद ग्रामीण रुग्णालयात रवाना करण्यात आले. दोघांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या वाहन चालकाचा लवकरच शोध घेतला जाईल अशी माहिती शहादा पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी दिली आहे.रात्री उशिरा पर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात येत होती.










