नंदुरबार | प्रतिनिधी
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय नंदुरबार येथे ड्रायव्हींग लायसन्स चाचणीसाठी येणार्या उमेदवारांना शास्त्रशुध्द पद्धतीने वाहन कसे चालवावे याचा अनुभव येण्यासाठी सिम्युलेटर मशीन बसविण्यात आले आहे .


राज्यातील सर्व प्रादेशिक व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात सिम्युलेटर मशीन शासनाद्वारे देण्यात आले असून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय , नंदुरबार येथे एक मशीन प्राप्त झाले आहे . व्हटॅक्स रिसर्च फाउंडेशन , तामिळनाडु या संस्थेने या मशीनची निर्मिती केली असून या मशीनची किंमत सुमारे ५.५ लक्ष रु . आहे . प्रत्यक्ष वाहन चालविण्याचा अनुभव येण्यासाठी या मशीनमध्ये स्टिअरींग व्हील , एल.सी.डी. स्क्रीन , गीअर बॉक्स , क्लच , ब्रेक , ऍक्सीलेटर , हॉर्न , वायपर , इंडिकेटर , इत्यादी सर्व यंत्रणा देण्यात आल्या आहेत . वाहनचालकाने सिम्युलेटर मशीनवर वाहन चालवितांना केलेल्या चुकांची नोंद संगणकाद्वारे घेतली जाते व मशीनवर सहा किलोमीटरचे ड्रायव्हींग पूर्ण झाले की त्या चुकांची यादी पहाण्यासाठी उपलब्ध होते . वाहनचालकाला प्रत्यक्ष रस्त्यावर वाहन चालविण्याचा अनुभव यावा यासाठी वेगमयदिचे फलक , सिग्नल यंत्रणा , नाईट ड्रायव्हींग , इत्यादी बाबींचा अंतर्भाव या मशीनमध्ये करण्यात आला आहे . उप प्रादेशिक परिवहन कार्यालय , नंदुरबार येथे दररोज सुमारे ६०-७० अर्जदार लायसन्स काढण्यासाठी येत असतात . यातील सुमारे ९ -१० अर्जदार चाचणीमध्ये अनुत्तीर्ण होतात अनुत्तीर्ण झालेल्या अर्जदारांना प्रशिक्षण देण्यासाठी या मशीनचा वापर करण्यात येत आहे अशी माहिती उप प्रादेशीक परिवहन अधिकारी किरण बीडकर यांनी दिली.









