नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील मांजरे येथे सेंट्रल बँकेतून कर्ज घेवून पिक पेरणी केली असतांना पावसाने दमदार हजेरी न लावल्यामुळे पिक पेरणीचे दुबार संकट आले. या नैराश्यातून शेतकर्याने शेतात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
नंदुरबार तालुक्यातील मांजरे येथील प्रविण आसाराम पाटील (४४) या अल्पभुधारक शेतकर्याने कोपर्लीतील सेंट्रल बँकेतून १ लाख २० हजाराचे कर्ज घेवून शेतात पिक पेरणी केली. परंतु जून महिन्यापासून दमदार पाऊस न झाल्याने पेरणी केलेली पिके धोक्यात आली. असे असतांना पिके वाचविण्यासाठी शेतकरी प्रविण पाटील हे रात्री अपरात्री जावून शेती पंपाद्वारे पिकांना पाणी देत होते. परंतु पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट, डोक्यावर बँकेचे कर्ज या नैराश्येतून प्रविण आसाराम पाटील या शेतकर्याने शेतातील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. शेतात पाणी देण्यासाठी गेलेले पती घरी परत आले नाहीत. म्हणून पत्नीने मुलगा व पुतण्यास पाहण्यासाठी पाठविले हे दोघेही शेततात गेले असता शेतकरी प्रविण आसाराम पाटील हे गहुस घेतलेल्या अवस्थेत मिळून आले. मयत शेतकरी प्रविण पाटील यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. याबाबत समाधान ईश्वर पाटील यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वरूपसिंग गावीत करीत आहेत.