म्हसावद l प्रतिनिधी
हुंडा विरोधी चळवळ महाराष्ट्र राज्य मुंबई या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन निबंध लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून शहादा येथीलपूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या के.व्ही.पटेल कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी स्मितल सुरेश देवरे हिला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.पारितोषिकाचा चषक महाविद्यालयास तर रोख रक्कम रूपये दीड हजार व प्रशस्तीपत्र विद्यार्थिनीस समारंभपूर्वक मिळणार आहे.
निबंध स्पर्धेचा निकाल संस्थेच्या वतीने घोषित करण्यात आला आहे.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रकाश पटेल यांना संस्थेकडून अभिनंदन पत्र प्राप्त झाले आहे. त्यात म्हटले आहे की,ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या लेखन क्षमतेवर विचार शक्तीवर आकलन क्षमतेवर झालेला परिणाम पाहून पालक आणि शिक्षकांची चिंता वाढली आहे.तसेच भाषा विषयांत विद्यार्थी मागे पडत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आलेले असतांना आमच्या निबंध स्पर्धेला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाला बघून वेगळाच निष्कर्ष निघत आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणारी सामाजिक संस्था हुंडाविरोधी चळवळीतर्फे राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विशेष बाब ही की,गेल्या ३३ वर्षापासूनच्या या उपक्रमात लॉकडाऊन मुळे खंड पडला नाही. निबंधाचे विषय होते कोविड-१९ महामारीने काय शिकवले ? , सोशल मीडिया शाप की वरदान , २१ व्या शतकात धर्माचे स्थान. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी, हिंदी, आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये 842 निबंध स्पर्धेत दाखल झाले. पहिल्या विषयावर 92 महाविद्यालयांतून 403 निबंध दुसऱ्या विषयावर 87 महाविद्यालयांतून 339 आणि तिसऱ्या विषयावर 49 महाविद्यालयांतून 100 असे एकूण 842 निबंध असा उत्स्फूर्त प्रतिसाद हेच दर्शवतो की युवा पिढीची लेखन क्षमता अबाधित असून युवकांची सकारात्मक विचार शक्ती समाजाला आणि पर्यायाने देशाला उज्वल भविष्य देण्यासाठी सक्षम आहे. स्पर्धेत नव्वद टक्के मुलींचा सहभाग होता. जाहीर झालेल्या एकूण 40 पारितोषिकांपैकी 36 पारितोषिके व 14 पैकी 12 रोख पारितोषिके मुलींनी पटकावली आहेत. सर्वोत्कृष्ठ निबंधाला दिली जाणारी रोशनलाल तलवार ट्रॉफी शहादा जि. नंदुरबार येथील पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या के. व्ही.पटेल कृषि महाविद्यालयातील स्मितल सुरेश देवरे हिला जाहीर झाला आहे.यातील चषक महाविद्यालयास तर रोख रक्कम व प्रशस्तीपत्र विद्यार्थीनीस दिली जाणार आहे. वरील तीन विषयांवरील निबंधांचे परीक्षण अनुक्रमे डॉ. कविता रेगे माजी प्राचार्या साठे महाविद्यालय, विलेपार्ले मुंबई, देवेंद्र भुजवळ निवृत्त संचालक माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय मुंबई आणि अनिल गोखले लेखक अंधेरी मुंबई यांनी केले. सर्वोत्कृष्ठ निबंधाची निवड सुप्रसिद्ध साहित्यिका श्रीमती माधवी कुटे यांनी केली असल्याचे महासचिव, हुंडाविरोधी चळवळ, मुंबई यांनी पत्रात नमूद केले आहे.राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थीनीचे अभिनंदन मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील, प्राचार्य डॉ.प्रकाश पटेल, प्राध्यापक वृंदाने केले आहे.या विद्यार्थीनीस महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.डॉ.भरत चौधरी व इव्हेंट मॅनेजर प्रा.डॉ.हेमंत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.








