नंदुरबार l प्रतिनिधी
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-2 व जल जीवन मिशनची गती वाढवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा,अंगणवाडी आणि ग्रामपंचायतीमध्ये ‘आयकॉनिक सप्ताह’ राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड. सिमा वळवी व उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत मिशन व जल जीवन मिशन अंतर्गत विविध उपक्रम व कामे सुरु आहेत. ही कामे व उपक्रम अधिक चांगल्या प्रकारे व्हावी या दृष्टीने ‘आयकॉनिक सप्ताह’ राबविण्यात येणार आहे.या सप्ताहामध्ये दि. 10 फेब्रुवारी 2022 पर्यंत जिल्ह्यातील जल जीवन मिशन अंतर्गत शंभर टक्के नळजोडणी झालेल्या सर्व गावात ‘हर घर जल’ घोषित केलेल्या गावांचा ग्रामसभेचा ठराव घेण्यात येणार आहे.त्याबाबतचे प्रमाणपत्र व व्हिडीओ क्लिप केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करावयाचे आहे .तर जिल्ह्यातील माध्यमिक विद्यालयातील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये ‘प्लास्टिक कचरा व्यवस्थापन’आणि ‘स्वच्छ पर्यावरण’ या विषयावर ऑनलाइन निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. तसेच सर्व शाळेतील सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये ‘सदृढ आरोग्य’ व ‘शुद्ध पिण्याचे पाणी’ या विषयावर ऑनलाइन निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक गावात ‘ग्रे वॉटरचे व्यवस्थापन’ याबाबत गावातील दर्शनी भागातील एका भिंतीवर याबाबतचे संदेश देणारे छायाचित्र काढण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा 2 व जल जीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या कामांच्या नोंदी केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर करण्यासाठी जिल्ह्याच्या वतीने ही मोहीम राबविण्यात येणार आहे.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘स्वच्छ पाणी व स्वच्छता संवाद’ या विषयावर ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची बैठक आयोजित करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या असून या बैठकीत ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती ‘नळ जोडणी व स्वच्छता’ या विषयावर चर्चा घडवून आणण्यात येणार आहेत .
त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती व गाव पातळीवरील कचरा साचलेल्या पाण्याची साफसफाई करण्यासाठी सामुदायिक श्रमदान करण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे.या ऑयकॉनिक सप्ताहात जिल्हयातील सर्व सरपंच ग्रामसेवक व शिक्षकांनी सहभागी होवून सप्ताहात राबविण्यात येणारे सर्व उपक्रम यशस्वी करावेत असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे , जलजीवन मिशन च्या प्रकल्प संचालक डॉ. वर्षा फडोळ ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बावीस्कर यांनी केले आहे.








