नंदुरबार l प्रतिनिधी
नंदूरबार रेल्वेस्थानका जवळ दि.२९ जानेवारी रोजी गांधीधाम-पुरी एक्सप्रेसच्या पॅन्ट्री कारला आग लागल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाकडून सायंकाळी उशिरापर्यंत रेल्वेच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली.मात्र त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. यानंतर स्टेशन प्रबंधकांच्या फिर्यादीवरुन लोहमार्ग पोलीसांत अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर काल दि. १ फेब्रुवारी रोजी घटनेच्या चौथ्या दिवशी फॉरेन्सिक पथकाकडून नमुने घेण्यात आले असून आता नेमका काय अहवाल प्राप्त होतो याकडे लक्ष लागून आहे.
नंदुरबार रेल्वेस्थानकात पोहचण्याआधीच गांधीधाम-पुरी एक्सप्रेस सकाळी आग लागली होती. सकाळी सुमारे साडेदहा वाजेच्या सुमारास सदरची घटना घडली.स्थानिक रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून आग लागलेल्या पॅन्ट्री कोच व इतर कोच वेगळे करण्यात आले. प्रवाशांना सुरक्षतस्थळी हलविण्यात आले. सुमारे दीड तास प्रयत्न केल्यानंतर आग विझली.या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्याच दिवशी सायकांळी भेट देण्यात आली व रेल्वे कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आले. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत नेमकी आग कशामुळे लागली? याबाबत बोलणे टाळले. दरम्यान, नंदुरबार येथील स्टेशन प्रबंधकांच्या फिर्यादीवरुन लोहमार्ग पोलीसात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेच्या चौथ्या दिवशी फॉरेन्सिक पथक दाखल झाले.सदरच्या पथकाकडून नमुने घेण्यात आले आहेत.यामुळे आता नेमका अहवाल काय प्राप्त होतो व यानंतर तरी आगीचे कारण स्पष्ट होते का? याकडे लक्ष लागून आहे.








