नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवुन प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आतापासूनच पक्ष संघटनासाठी कामाला लागावे. येत्या विधानसभा निवडणूका नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढविणार आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादीच्या प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांनी दिल्या आहेत.
मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व युवक काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील यांनी घेतली. या बैठकीला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, सरचिटणीस गर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हा निरीक्षक नानासाहेब महाले, युवक निरीक्षक सत्यजीत सिसोदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा, महिला जिल्हाध्यक्षा अॅड.अश्विनी जोशी आदी उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्ष कामकाजाचा आढावा जाणून घेतला. तसेच 2023 व 2024 मध्ये होणार्या आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन वाढविण्यावर भर द्यावा. तसेच आगामी विधानसभा निवडणूका नंदुरबार जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढविणार आहे. म्हणुन त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करावे. याकरीता गाव तेथे राष्ट्रवादी काँग्रेसची शाखा, बुथनिहाय रचना तयार करुन कमिटी गठीत कराव्यात, अशा सूचना ना.जयंत पाटील यांनी यावेळी बैठकीत दिल्या. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटन मजबुत करण्यावर भर देवून प्रत्येक गाव-पाड्यांवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे संघटन मजबुत करावे, असेही प्रदेशाध्यक्ष ना.जयंतराव पाटील यांनी सांगितले.