नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार ते निझर रस्त्यावर भरधाव गाडी उलटून झालेल्या अपघातात चालक जागीच ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,धुळे येथे अवधानमध्ये राहणारे लोटन रतिलाल मोरे हे वाहनात तीन जणांना बसवून नंदुरबार ते निझर रस्त्याने जात होते. भरधाव वेगात असतांना समोरून येणार्या लाईटच्या प्रकाशामुळे रस्ता लक्षात न आल्याने गाडी खाली उतरविली असता विरूध्द दिशेने वाहन चालविले. यामुळे गाडी उलटून झालेल्या अपघातात चालक लोटन रतिलाल मोरे (३८) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच प्रभाकर विनायक वाघ जिजाबराव रतिलाल वाघ , विनोद रमेश सरदार सर्व रा.अवधान धुळे हे तिघे जण जखमी झाले आहे तसेच वाहनाचेही नुकसान झाले आहे. याबाबत प्रभाकर विनायक वाघ यांनी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयत लोटन रतिलाल मोरे याच्याविरूध्द भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटारवाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेकॉ पितांबर जगदाळे करीत आहेत.