नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार शहरात रेशननिंगचे गहू बाजारात विक्रीसाठी घेवून जाणार्या महेंद्र पिकअपला महसूल विभागाच्या कर्मचार्यांनी पकडले असून गहूसह ३ लाख ५९ हजार ४० रूपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरालगत असलेल्या टोकरतलाव रस्त्यावर विजय अग्रवाल हा महेंद्र कंपनीचा पिकअप वाहनाने (क्र.एम.एच.३९-ए.डी. १२८५) हिच्यात रेशननिंगचे गहू बेकायदेशीरित्या विक्रीसाठी घेवून जात असतांना महसूल विभागाने या गाडीला पकडले. यावेळी ५ हजार ९४० रूपये किंमतीचे ६० कट्टे रेशनिंगचे गहू व ३ लाख रूपये किंमतीचे वाहन जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी नंदुरबार तहसिल कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक समराज गंभीर वाळेकर यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात वाहन चालक दिलवरसिंग वजीरसिंग वसावे रा.तारापूर (ता.नवापूर), विजय फत्तेचंद्र अग्रवाल रा.खांडबारा (ता.नवापूर) यांच्या विरूध्द जीवनावश्यक वस्तु कायदा १५५ चे कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी चालक दिलवरसिंग वसावे याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोनि अर्जुन पटले करीत आहेत.