तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील कोठार ते तोलाचापड फाट्याजवळ वळणावर मोटार सायकल वाचवण्याच्या प्रयत्नात बोलेरो पीक अप जीप उलटल्याने झालेल्या अपघातात जण ९ गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रोझवा पुनर्वसन ता.तळोदा येथील रहिवासी धडगाव तालुक्यातील नर्मदा काठावरील ओट्टी येथे त्यांच्या नातेवाईकांकडे उत्तरकार्याच्या कार्यक्रमासाठी पीक अप गाडी (क्र. एम.एच.२१, एक्स ०६०७) हिने जात होते. तोलाचापड फाट्याच्यापुढे रस्त्यावरील तीव्र वळणावर कोठार कडून येणारी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्नात पीक अप चालकाचे वाहनारील नियंत्रण सुटले व गाडी रस्त्याच्या शेजारी शेतात उलटली. या अपघातात नवा रायसिंग पावरा (६०), तारवी नवा पावरा (५०), वसंत पाडवी वसावे (३०), बारक्या फुगऱ्या पावरा, उच्या पाडवी (४५) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर सुरत्या नहाल्या पाडवी (४१),देवली सिंगऱ्या पाडवी (३०), कमला नरसिंग पाडवी (३५),बामणी नहाल्या पाडवी (६)) यांच्यावर तळोदा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात गाडीचे देखिल मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरीकांनी अपघातस्थळी पोहचवून मदत व बचावकार्य केले.