नंदूरबार l प्रतिनिधी
सातपुडा पर्वत रांगेतील डाब (ता.अक्कलकुवा) येथे गेल्या तीन दिवसांपासून बर्फ पडत आहे. तेथील तापमान 3 अंश सेल्सिअस पर्यंत पोहचले आहे.
गेल्या आठवड्यात देखील या ठिकाणी दवबिंदू गोठून बर्फ पडला होता. याशिवाय महाराष्ट्रातील क्रमांक 2 चे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ (ता. धडगाव) येथेही दवबिंदू गोठले आहेत.
गेल्या आठवड्यापासून नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा खालावला आहे. जिल्ह्याचे तापमान 7 ते 10 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले आहे. डाब हे सातपुडा पर्वतातील सर्वात थंड भाग आहे.दरवर्षी या ठिकाणी डिसेंबर , जानेवारी महिन्यात तापमान खालावल्यानंतर बर्फ पडत असतो. यावर्षी मात्र बर्फ पडण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठवड्यात चार ते पाच वेळा या ठिकाणी बर्फ पडला असून दवबिंदुही गोठले आहेत. त्यामुळे सर्वत्र गारठा पसरला आहे.