नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबारच्या रक्तदात्यांच्या रक्तदान चळवळीची दखल रक्तदान चळवळीत काम करणारी राष्ट्रीय स्तरावरील राजस्थानमधील कोटा येथील ह्यूमन सोशल फाऊंडेशनने घेतली.राजस्थानमधील कोटा येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेत श्री.छत्रपती ब्लड फाऊंडेशनचा ‘प्राईड नॅशनल अवॉर्ड’ पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. सदरच्या पुरस्कारातून रक्तदान चळवळीत काम करणाऱ्या रक्तदात्यांचे मनोबल उंचावणार आहे.
नंदुरबार हा दुर्गम-अतिदुर्गम भागात वसलेला जिल्हा असून येथे सिकलसेल ॲनिमिया, थॅलिसिमियाच्या रुग्णांसह अनेकदा रक्ताचा तुटवडा भासतो.मात्र येथील जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीसह खासगी रक्तपेढींमध्ये अनेकदा रक्ताची वाणवा दिसून येते यामुळे गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना रक्तासाठी फिरफिर करावी लागत होती.मात्र नंदुरबारच्या काही युवकांनी पुढाकार घेत सोशल मिडीयाच्या व्हाटस् ॲप गृपवर श्री.छत्रपती ब्लड फाऊंडेशनच्या माध्यमातून शेकडो रक्तदात्यांना एकत्रित केले आणि सदर गृपमधील रक्तदाते स्वयंस्फूर्तीने जिल्हा रुग्णालयात जावून रक्तदान करत रुग्णाचा जीव वाचविण्यात मोलाची भूमिका बजावताय.
नंदुरबार जिल्हा रुग्णालयात अनेकदा रक्ताचा तुटवडा भासतो.यामुळे येथे उपचारासाठी दाखल रुग्णांना अनेकदा खासगी रक्तपेढीतून रक्त आणावे लागते.तर अनेकदा खासगी रक्तपेढीतदेखील रक्त उपलब्ध नसल्याने रक्तासाठी फिरफिर करावी लागते. त्यातच नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांची परिस्थिती हलाखीची असल्याने बाहेरुन विकतचे रक्त आणणे परवडणारे नसते तर कित्येकदा रक्ताअभावी अनेकांचा जीव गेल्याच्या घटना घडत असल्याचे कानावर आल्याने नंदुरबारमधील माळीवाडा येथील रहिवासी असलेले तरुण जीवन माळी यांनी छत्रपती ब्लड फाऊंडेशन नावाचा गृप निर्माण केला.रक्तदान चळवळीत काम करण्याची इच्छा असणाऱ्या काही मित्रांना सोबत घेवून गरजू रुग्णांची रक्ताची निकड भागविण्यासाठी स्वत:ला वाहून घेण्याचा संकल्प करण्यात आला आणि यात आता पाहता पाहता आता या रक्तदान चळवळीत सुमारे दोन ते अडीच हजार रक्तदाते जोडले गेले आहेत. यामुळे एखाद्या रुग्णाला रक्ताची गरज असल्याचा संदेश गृपवरुन प्रसारित होताच संबंधित रक्तदाता स्वयंस्फूर्तीने जिल्हा रुग्णालय गाठतो आणि रक्तदान करुन रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी तत्परता दाखवतो.
नंदुरबारच्या रक्तदात्यांच्या या रक्तदान चळवळीची दखल रक्तदान चळवळीत काम करणारी राष्ट्रीय स्तरावरील राजस्थानमधील कोटा येथील ह्यूमन सोशल फाऊंडेशनने घेतली.राजस्थानमधील कोटा येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेत श्री.छत्रपती ब्लड फाऊंडेशनचा ‘प्राईड नॅशनल अवॉर्ड’ पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. सदरच्या पुरस्कारातून रक्तदान चळवळीत काम करणाऱ्या रक्तदात्यांचे मनोबल उंचावणार आहे.








