तळोदा l प्रतिनिधी
येथे उच्च विद्युत दाबामुळे शॉर्टसर्किट होऊन तळोदा शहरातील पूर्व पट्यातील काही कॉलनीतील विद्युत मीटर व उपकरणे जळून खाक झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.
शनिवारी (दि. 9 जानेवारी) रात्री 12 वाजेच्या सुमारास परिसरातील विद्युत रोहित्रात बिघाड झाल्याने उच्च विद्युत दाब तयार झाल्यामुळे या परिसरातील विद्युत मीटर, टीव्ही संच, बल्प आदी जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान सर्व्हिस वायर जडाल्या कारणाने विद्युत पोल वर विद्युत घर्षण होऊन विजेचा अक्षरशः तांडव पहावयास मिळाला आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा केला व धावत बाहेर आले. या भागातील महेंद्र गिरसे, मनोज चिंचोले, भरत पाटिल, दत्ता कलाल, गणेश ट्रेडर्स ,रसवंती, अन्नपूर्णा हॉटेल यांच्यासह परिसरातील नागरिकांचे व नूतन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी मीटर व घरातील अन्य इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जळाले असून यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रात्री 1 वाजेच्या सुमारास वायरमन दुरुस्तीसाठी आले असता रोहित्रवरील मुख्य विद्युत तार जळून खाली पडले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान यावेळी देखील विद्युत खांबवर जोरदार स्पार्किंग सुरू होती. विद्युत वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली, रात्रभर या परिसरात अंधार होते. दिवसभर कर्मचारी विद्युत पुरवठा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत होते. सदर घटनेचा पंचनामा करून सर्व लोकांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी व नवीन विद्युत मीटर बसवून वीज सुरु करावी अशी मागणी परिसरातील लोकांनी केली आहे. दुपारी 1 वाजेच्या सुमारास या परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत झाला.








