तळोदा | प्रतिनिधी
तळोदा येथील विद्युत वितरण विभागाच्या कार्यालयासमोर असलेल्या जय गुरुदेव किराणा दुकानात रात्री चोरी झाल्याची घटना घडली असून अज्ञात चोरट्या विरोधात तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि.६ जानेवारी रोजी रामेश्वरलाल मंगलराम कुमावत रा.तापीनगर तळोदा यांच्या मालकीच्या असलेल्या विद्युत वितरण विभागाच्या कार्यालयाच्या समोर असलेले जय गुरुदेव किराणा दुकानात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दुकानात शिरून ६ हजार ५०० रुपयांचे तेलाचे पाच बॉक्स व एका लिटरचे दहा पाऊच, ४ हजार ५०० रुपयाचे शेंगतेलचे बारा लिटरचे तीन बॉक्स, ३ हजार ८०० रुपये किंमतीचे तांदूळाचे सहा पोते, २ हजार ७०० रुपये किंमतीचे तांदूळ पंचवीस किलो, १ हजार १०० रुपये किंमतीचे बिस्कीट, साबन, चॉकलेट बॉक्स, किरकोळ सामान असे एकूण २८ हजार ५०० रुपयांचा सामान चोरुन नेल्याची घटना घडली. सदर घटनेची माहिती मिळताच तळोदा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा व पोलिस कर्मचारी तसेच व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आनंद सोनार, मनोज भामरे यांनी तपास लवकर करण्यासाठी मागणी केली आहे.
घटनेच्या अनुषंगाने अज्ञात चोरट्या विरुध्द तळोदा पोलिस ठाण्यात कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक केलसिंग पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली पोना.हर्षल सांळुके करीत आहे.








