शहादा | प्रतिनिधी
मुंबई येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे शहरात आगमन झाल्यानंतर शिवप्रेमींनी जल्लोषात स्वागत केले.आज सकाळी ११ वाजता शहरातील डोंगरगाव चौफुली पासून स्मारक समितीतर्फे सर्वसमावेशक छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या अश्वारूढ पुतळ्याची वाजत-गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली.

फुलांनी सजविलेल्या गाडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते क्रेनच्या साहाय्याने पुष्पहार टाकून मिरवणुकीस शुभारंभ करण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष असा जनसमुदाय उपस्थित होता. मिरवणुकीत विविध राजकीय सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, शिवप्रेमी हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते.मिरवणूक डोंगरगाव चौफुली, अहिंसा चौक ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक ,शासकीय विश्रामगृह , सप्तशृंगी माता मंदिर मार्गे शिवतीर्थ च्या ठिकाणी आणण्यात आली.मिरवणुकीत घोषणाबाजीने कमालीच्या जल्लोष केला.मिरवणुकीचा दुतर्फा मार्गावर अक्षरशा पुष्पवृष्टी करण्यात आली.तालुका शिवसेना कार्यालय जवळ अरुण चौधरी व त्यांच्या सहकार्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली.मिरवणुकीच्या मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.ठिक ठिकाणी गुढ्या उभारल्या होत्या.स्वागताचे फलक लावलेले होते.पूर्ण मार्गावर भगवी झालर व भगवे झेंडे लावण्यात आले होते.ठिकाणी विविध सेवाभावी मंडळांनी अहिंसा चौकात जैन समाजातर्फे,समाजसेवा ग्रुपतर्फे,राम राम गणेश मंडळ यांनी शिवप्रेमींसाठी पिण्याच्या पाण्याची अल्पोहार शरबतची तर शिवछत्रपती ग्रुपतर्फे ज्ञानेश्वर चौधरी विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ताक वाटप केले.शहादा शहर मुस्लिम समाजातर्फे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली.दुपारी साडेचार वाजता शिवतिर्थाजवळ मिरवणुकीचा समारोप झाला.साधारणता एक महिन्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळा होणार आहे.उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे ,पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.सारंगखेडा म्हसावद व धडगाव येथून ज्यादा पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी मागविण्यात आले होते.








