नंदूरबार l प्रतिनिधी
कर्नाटकातील बंगरूळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. यावेळी छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुतळ्याची विटंबना करणाऱ्या संशयितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नंदुरबार जिल्हा मनसेने केली आहे.
कर्नाटक राज्यातील बंगरूळ येथे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची समाजकंटकांकडून विटंबना करण्यात आली आहे. यामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नंदुरबार येथे निदर्शने करून निषेध नोंदविण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर परिसरातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास मनसे सैनिकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच बंगरुळ येथे झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ निषेध नोंदविण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हा सचिव पवन गवळे, तालुकाध्यक्ष राकेश माळी, नवापुर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सुनील कोकणी, कल्पेश माळी, अजय चौधरी, दिपक चौधरी, विराज चौधरी, राजेंद्र चौधरी, दिवेश चौधरी, राम ठक्कर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.








