नंदुरबार | प्रतिनिधी
मरण पावलेल्या व्यक्तीच्या छायाचित्राचा दुरूपयोग करीत तो व्यक्ती आपण असल्याचे भासवून बनावट आधारकार्ड काढून नंदुरबार येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट कागदपत्राचा आधार घेत जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार करून फसवणूक केल्याप्रकरणी आठ जणांविरूध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषा चेतन अहिरे (रा.भागापूर, ब्राम्हणपुरी ता.शहादा) शिक्षीत तरूणीचे आजोबा पुंजाराम राघो अटक यांचा २००८ साली मृत्यू झाला होता. तत्पुर्वी त्यांनी नंदुरबार शहरात जमिन घेतली होती. ती जमिन विक्री झाल्याचे अलीकडेच मनिषा अटक (अहिरे) यांना कळले. त्यांनी दिलेल्या नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद म्हटले आहे की, त्यांचे आजोबा पुंजाराम राघो अटक हे मयत आहेत. असे असतांना आजोबांचे बनावट आधारकार्ड बनवून संगनमत करून फकिरा मोतीराम जाधव यांनी स्वतःला आजोबांचा जागी उभे करून पुंजाराम अटक नाव धारण केले व पुंजाराम असल्याचे भासविले. त्यानंतर नंदुरबार शहरातील बिनशेती सर्व्हे क्र. २०३/ २/२, २०४/ २, २०४/ २/२ (संगणकीय क्रमांक ६६२) हेमंत नगरमधील प्लॉट क्र. ३० चे क्षेत्रफळ २०८ चौरस ही मिळकत दि.२ जून २०२० रोजी व दि.२१ ऑगस्ट २०२१ रोजी बेकायदेशीर खरेदी विक्री करून फसवणूक केली. म्हणून मनिषा अटक (अहिरे) यांच्या फिर्यादीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फकिरा मोतीराम जाधव रा.भोणे (ता.जि.नंदुरबार), अनिषा प्रदीप भावसार, संगिता सुनिल भावसार दोन्ही रा.दोंडाईचा (ता.शिंदखेडा जि.धुळे), जगदिश भिक्कन चित्रकथे रा.खापर (ता.अक्कलकुवा), भरत बन्सीलाल रघुवंशी, मुकेश शिंत्रे दोन्ही रा.नंदुरबार याचा विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकेश पवार करीत आहेत.










