नंदूरबार l प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यातील धडगांव-वडफळ्या-रोषमाळ-बु. नगरपंचायतीच्या सदस्य पदांच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने नगरपंचायतीच्या मतदार क्षेत्रातील शस्त्र परवानाधारकांकडील (राष्ट्रीयकृत व इतर बँकांचे तसेच कारखान्यातील सुरक्षा कर्मचारी, पोलिस कर्मचारी वगळता) शस्त्र बाळगण्यावर निर्बंध घालण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत.
विशिष्ट परवाना धारकांच्या बाबतीत त्यांची गरज तपासून ठराविक कालमर्यादेसाठी परवाना धारकांनी शस्त्र बाळगण्याची परवानगी मागितल्यास त्यांच्या अर्जावर तपासून निर्णय घेण्यात येईल. निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर शस्त्र बाळगण्यावरील निर्बंध आपोआप रद्द होतील आणि जमा केलेली शस्त्रे परवानाधारकांना मतमोजणीच्या एका आठवड्यानंतर परत करण्यात येतील. विनापरवाना अवैध शस्त्रांचा वापर होणार नाही याकरीता आयोगाच्या निर्देशानुसार पोलिस विभागाने कारवाई करावी, असेही जिल्हादंडाधिकारी श्रीमती खत्री यांनी आदेशात नमूद केले आहे.









