शहादा । प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील कहाटुळ येथे एकाच वेळेस चार दुकानातून सुमारे 70 हजार रुपये रोख व माल लंपास करीत एका घरात चोरीची घटना घडली आहे. ग्रामीण भागातून चोरीच्या घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अही की, कहाटुळ ता.शहादा येथे दि. १ डिसेंबर रोजी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरटयांनी बसस्थानक परिसरात असलेल्या राकेश शिंपी यांच्या मालकीच्या संतोषी किराणा दुकानातून रोख रक्कम पाच ते सात हजार रुपये व किराणा माल, प्रकाश माळी यांच्या मालकीच्या पांडुरंग इलेक्ट्रॉनिक व हार्डवेेअर यांच्या दुकानातून दहा ते वीस हजार रुपये रोख, दिलीप महाजन यांच्या मालकीच्या आनंद पान सेंटरमधून आठ ते दहा हजार रुपये रोख लंपास केले.
चोरांनी लोखंडी सळईने दुकानांचे शटर वाकवित दुकानात आत शिरत मिळेल तो माल, कॅश काँऊटर गल्ल्यातून रोख रक्कम चोरटयांनी लंपास केले आहे. प्रल्हाद सखाराम महाजन यांच्या मालकीचे हॉटेल मिलन येथून वीस ते पंचवीस हजार रुपये रोख चोरांनी चोरून नेले आहे. चोर एवढ्यावर न थांबता गावात फेरी टाकत प्रकाश भावडु पाटील यांच्या घरात चोरांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना खाली हाताने परतावे लागले.शहादा तालुक्यातील ग्रामीण भागात चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढलेले आहे. कहाटुळ येथे मात्र एकाचवेळी चार दुकाने फोडण्याची घटना ही प्रथमच घडलेली असल्याने दुकानदारांंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल झालेल्या चार दुकानांच्या घरफोडीसोबत एका घरातील चोरीचा प्रयत्न असफल झाला असला तरी चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.या परिसरात रात्रीच्या पोलीस गस्त वाढविण्याची मागणी देखील नागरिकांनी केली आहे.








