शहादा ! प्रतिनिधी
दुर्गम भागातील नर्मदा नदीच्या परिसरात असलेल्या सातपुड्याच्या अतिशय दुर्गम भागातील शहाद्याच्या इंकलाब ब्रिगेडतर्फे ग्रामस्थांना ताडपत्री (प्लास्टिक) व लहान मुलांना चप्पलचे वाटप करण्यात आले. सदर प्रोजेक्ट हेमकुंट फाउंडेशन व नर्मदा बचाव अभियान यांच्या तर्फे घेण्यात आला.
सातपुडा पर्वतात नर्मदा नदी परिसरातील अतिशय लहान अश्या डनेल, ब्राम्हणी, चिमलखेडी अश्या पाड्यावर हा उपक्रम राबविण्यात आला. दरम्यान डणेल येथील नर्मदा बचाव समितीतर्फे चालवण्यात येणाऱ्या जीवन शाळेला देखील भेट देऊन तेथील मुलांना चप्पल तसेच शाळेला ताडपत्रीचे वाटप करण्यात आले.
धडगाव पासून दोन तासाचे अंतर खाजगी वाहनाने व तेथून पुढे मांडवपासून अर्धा तासाचे अंतर पायी तर उर्वरित एक तासाचे अंतर होडीने पूर्ण करीत इंकलाब ब्रिगेडचे सर्व सदस्यांनी दुर्गम भागातील नागरिकांच्या प्रवासाबाबतचे अनुभव घेत हा उपक्रम राबविला. या कार्यकर्त्यांना अनेक जिवनावश्यक गोष्टींची जाणीव करून गेला. 21व्या शतकातील आपली पिढी एकीकडे व दुसरीकडे अजूनही मुख्य प्रवाहापासून वंचित असलेल्या या पिढीतील तफावतची प्रत्यक्ष जाणीव झाल्याचा अनुभव या सदस्यांना जाणवला.
अश्या दुर्गम व रस्त्यांचा पत्ता नसलेल्या पाड्यांपर्यंत जाऊन होईल तितकी मदत या भागात करावी तसेच जमल्यास आपल्या कुटुंबा सोबत अश्या ठिकाणी भेट दिल्यास जीवन म्हणजे काय याची प्रचिती येत असल्याचे इंकलाब ब्रिगेडच्या एका सदस्याने यावेळी सांगितले.