नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील पुरुषोत्तमनगर येथील श्री सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याचा 47 वा गळीत हंगामाचा शुभारंभ दि.27 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील उपस्थित राहणार आहेत. संगणकीकृत ऊस वजन काट्याचे पूजन माजी मंत्री तथा आ.डॉ.विजयकुमार गावित, माजी आ.राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते होणार आहे. मिल, बॉयलर, ऑटोमेशन विभागाचे उद्घाटन मुंबई येथील उद्योगपती विलास वडके व सुमित वडके यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आ.राजेश पाडवी, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. श्री नागाई देवी शुगर प्रायव्हेट लिमिटेडचे माजी आमदार शिरीष चौधरी, उद्योगपती रवींद्र चौधरी विशेष निमंत्रीत आहेत. कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन व्हा.चेअरमन प्रेमसिंग आहेर, प्रभारी कार्यकारी संचालक अशोक पाटीलव संचालक मंडळाने केले आहे.








