तळोदा l प्रतिनिधी-
तळोदा शहरातील बाजारपेठ व मेन रोड येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावणे त्यास प्रशासन व शासनाने निधी उपलब्ध करून बसविण्याचे आदेश देणे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व खासदार हिनाताई गावित तसेच पोलिस अधिक्षक, नंदुरबार यांना तळोदा व्यापारी महासंघ यांच्यातर्फे देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, मागील काही काळात शहरातील बाजारपेठांमध्ये होणारे प्रकार जसे चोरी, चैन स्नॅचिंग, रेकी करून हल्ला करणे, पिस्तूल दाखवणे, व्यापाऱ्यांची पैशांची बॅग मोटर सायकल वर पळविणे, मुलींची छेडछाड करणे, टोळक्याने येऊन बेदरकार वाहने हाकणे, टवाळखोरपणा करणे त्यामुळे तळोदा शहरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीपूर्वक वातावरण होत आहेत. त्यामुळे शहराचे नाव खराब होत आहे व व्यापार उदीम करण्यास त्रास होत आहे. म्हणून जिल्हाधिकारी व खासदार डॉ.हिनाताई गावीत तसेच पोलिस अधिक्षक आपणास व्यापारी महासंघ विनंतीपूर्वक मागणी करतो की, शासन स्तरावरून निधी उपलब्ध करून प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश लवकरात लवकर देण्यात यावेत जेणेकरून शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होईल आणि भविष्यात होणाऱ्या घटनांवर वचक आणि झालेल्या घटनांचा मग काढण्यास सोयीस्कर होईल. अशा मागणीचे निवेदन तळोदा व्यापारी महासंघातर्फे देण्यात आले.
निवेदन देतेवेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आनंद सोनार, प्रसाद सराफ, मुकेश वाणी, उदय सुर्यवंशी, प्रशांत गांधी, प्रविणचंद जैन, विनय ठक्कर, किर्तीकुमार शहा, योगेश सराफ, हंसराज जैन, दिनेश जैन, राजेंद्र राजपूत आदी व्यापारी उपस्थित होते.








