नंदुरबार l प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त १५ ते २२ नोव्हेंबर २०२१ दरम्यान जनजाती गौरव दिनानिमित्त जनजाति गौरव सप्ताह साजरा करण्याचे घोषित केले होते. त्या पार्श्वभूमीवर पथराई येथे ‘जनजाती गौरव सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नंदुरबार लोकसभा प्रभारी राजेंद्रकुमार गावीत हे होते. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम काळे हे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा व देवमोगरा मातेचे प्रतिमा पूजन करून दीपप्रज्वलनाने पारंपारिक पद्धतीने अभिवादन करण्यात आले. पुरूषोत्तम काळे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनाबद्दल, त्यांचे आदिवासी समाजासाठीचे योगदान, त्यांनी विपरीत परिस्थितीत केलेल्या सामाजिक चळवळीचे नेतृत्व, मातृभूमीसाठी केलेले कार्य, भगवान बिरसांनी स्थापन केलेल्या बिरसाईत पंथाबद्दल व बिरसानी दिलेल्या १२ संदेशाबद्दल अनमोल माहिती दिली. ईश्वर अर्थात सिंग भोंगा (भगवान) एक आहे, गोमातेची सेवा करा व सर्व प्राणिमात्राप्रती दयाभाव ठेवा, अशुद्ध भोजन करू नका, घर नेहमी स्वच्छ ठेवा, आपल्या अंगणात तुळशीचे रोप लावा, मोठ्यांचा आदर करा, वाईट संगती पासून दूर राहा, पर धर्मापेक्षा स्वधर्मावर विश्वास ठेवा, आपली संस्कृती आपला धर्म आणि आपल्या पूर्वजांच्या प्रती श्रद्धा ठेवा, धर्म संस्कृती व परंपरा यांना विसरू नका, कारण तीच आपल्या समाजाची खरी ओळख आहे. संघटीत राहा, आपापसात लढू नका, आठवड्यातून एकदा गुरुवारी भगवानची पूजा करा, त्यादिवशी नांगर धरू नका, परधर्मीयांच्या प्रलोभनांना बळी पडू नका, भगवान बिरसांनी दिलेल्या या संदेशास बिरसाईत म्हणून ओळखले जाते. या शिकवणुकीचा संदेश प्रत्येकाने आचरणात आणणे काळाची गरज असल्याचे श्री.काळे यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणात राजेंद्रकुमार गावीत यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त सप्ताहाचे महत्व पटवून दिले. एका दिवसासाठी जयंती साजरी करून चालणार नाही, तर त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपल्याला पुढेही सामाजिक सुधारणेची चळवळ चालू ठेवावी लागेल. यासाठी पुढील वर्षीपासून जनजाती गौरव दिनानिमित्त पूर्ण सप्ताहाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे राजेंद्रकुमार गावित यांनी सांगितले. केंद्र सरकारकडून भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतात जनजाती गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा जो निर्णय घेण्यात आला, त्याबाबतीत आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भानुदास वळवी यांनी तर आभार प्रदर्शन सतिलाल चौरे यांनी केले.








