तळोदा | प्रतिनिधी
कृषि वीज कनेक्शन खंडित करू नये अन्यथा रस्त्यांवर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा देत भाजपा किसान आघाडी तर्फे तळोदा तहसिलदार गिरीष वखारे यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने २२ नोव्हेंबर पासून कृषि पंपाचे वीज कनेक्शन खंडित करण्याचा फतवा काढला आहे त्याच्या निषेध भाजपा किसान आघाडी करत असून सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. पेरणी करण्यात येत आहे. परंतु महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे कृषि वीज कनेक्शन तोडण्याच्या आदेश दिला आहे हा आदेश शेतकऱ्यांवर अन्याय करणार आहे.
अतिवृष्टीमुळे कपाशीवर बोंड आळीचा प्रादुर्भावामुळे शेतकरी वर्ग अधिक अडचणीत सापडला आहे. त्यात शासनाने वीजपुरवठा खंडित केला तर शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल तरी सरकारने वीज कनेक्शन कट करू नये नाहीतर नाईलाजास्तव भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनावर तळोदा शेतकरी आघाडी अध्यक्ष संजय माळी, लकेश माळी, जगन माळी, अशोक सूर्यवंशी, राजेश माळी, शिरीष माळी, योगेश चव्हाण आदींसह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.








