तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील झिरी(पाठडी) येथे तळोदा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आदिवासी क्रांतिकारी जननायक बिरसा मुंडा जयंती व बाल दिनाचे प्रणेते भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी खेडो-पाडी काँग्रेस पक्षाचे विचार व कार्य लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी जनजागरण अभियानाची सुरुवात करण्यात आली.
उलगुलानचा प्रणेता, आदिवासी नायक म्हणून ओळखले जाणारे बिरसा मुंडा हे आज सुद्धा आदिवासी लोकांच्या मनामध्ये जिवंत आहे. 15 नोव्हेम्बर हा दिवस त्यांच्या जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो.पाणी जल भूमिसाठी लढाई शतके जुनी आहे.या लढाईत शेकडो नायक आले.& गेले .परंतु हा लढा आजही कायम आहे.आदिवासींच्या नेतृत्वात 19 व्या शतकात महान अशी चळवळ करून अन्यायत्याचारविरोधात ब्रिटिशांविरुद्ध ” उलगुलान ” ची हाक देऊन लढा उभारणाऱ्या जननायकाच्या जीवन कार्याविषयी असलेला आदर व्यक्त करून अभिवादन करण्यात आले. आणि बाल दिनाचा प्रणेता भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवन कार्याच्या स्मृतीला उजाळा देवून बालकाप्रति असलेला त्यांचा प्रेमभाव विशद करून मान्यवरांनी अभिवादन केले.
यावेळी खेडो-पाडी काँग्रेस पक्षाच विचार व कार्य लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी जनजागरण अभियानाची सुरुवात करण्यात आली.प्रसंगी जि. प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी यांनी म्हटले की, जनजागरण अभियानातून काँग्रेस पक्षाने 70 वर्षात काय केले याची माहिती प्रत्येक लोकांपर्यंत पोहचविणे व आदिवासी बांधवांना डोळ्यासमोर ठेवून बनविण्यात आलेला पक्षाचा अजेंडा तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्यात येईल असे प्रतिपादन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी यांनी म्हटले की -सातत्याने दरवाढ करून स्वतःच्या तिजोऱ्या भरणाऱ्या मोदी सरकारचा विरोध करण्यासाठी दि.14 ते 29 नोव्हेम्बर दरम्यान जनजागरण अभियानातून तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन केंद्र सरकार कसे गरीब व शेतकरी विरोधी आहे.याची जनजागृती करण्यात येईल असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रोहिदास पाडवी यांनी केले तर आभार सरपंच लहू पाडवी यांनी मानले. यावेळी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष प्रविण वळवी, आदिवासी मौखिक साहित्य परिषदेचे मुख्य संयोजक प्रा.भिमसिंग वळवी, संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य धर्मेंद्र वळवी, सतिवान पाडवी, नरहर ठाकरे, सेवादलाच राहुल पावरा, अर्जुन वळवी, मान्या पावरा, प्रताप पाडवी, सुरेश आण्णा इंद्रजित ,रतीलाल वळवी आदी उपस्थित होते.








