तळोदा l प्रतिनिधी
थकीत वीज बिलाचे कारण दाखवत वीज महावितरण कडून तळोदा येथील पंचायत समितीच्या वीज पुरवठा वेळोवेळी खंडित होत असल्याने विजेअभावी दैनंदिन शासकीय कामकाजात वारंवार अडथळे येत आहेत.
वास्तविक वीज बिल भरण्याची अंतिम दि. ३०नोव्हेंबर ही असून बिला वर नमूद केलेल्या तारखेपूर्वी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता दि.१५ रोजी तळोदा पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या इमारतीच्या वीजपुरवठा कट केला आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या सभापती लताबाई अर्जुन वळवी यांनी महावितरण कडून पंचायत समितीला वेठीस धरण्याच्या आडमुठे धोरणाविषयी पदाधिकाऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
थकीत बिलाच्या कारणावरून दि.१५ रोजी तळोदा पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या इमारतीतील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यापूर्वी अर्थात दि.२४ जून रोजी महावितरणकडून संपूर्ण पंचायत समितीचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या तीन महिन्याच्या अंतराने पुनश्च दुसऱ्यांदा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. वास्तविक पहिल्यावेळी विद्युत पुरवठा खंडित केल्यानंतर महावितरणला थकीत बिलाची रक्कम अदा करण्यात आली होती. आता केवळ दोन महिन्यांचे ३ हजार ६६० रु एवढी बिलाची रक्कम अदा करणे बाकी होते. तसेच महावितरणच्या बिलावर देखील सदर रक्कम अदा करण्याची अंतिम मुदत दि.३० नोव्हेंबर ही दर्शविण्यात आली आहे. असे असताना तत्पूर्वीच विद्युत पुरवठा खंडित कसा काय करण्यात आला? या विषयी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता ,आम्हाला वरिष्ठांकडून आदेश असल्याचे सांगण्यात आले आहे. वास्तविक वीज देयकावर दर्शविन्यात आलेल्या अंतिम मुदतीपूर्वी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पंचायत समिती कर्मचाऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात असून महावितरणकडून पंचायत समितीचे वारंवार वीज कनेक्शन कट करून पंचायत समितीला वेठीस धरणाऱ्या महावितरणच्या या मनमानी कारभाराविषयी पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान पंचायत समितीच्या बांधकाम इमारतीत बांधकाम विभागासह, शिक्षण विभाग तसेच पाणीपुरवठा विभागाचे दैनंदिन कामकाज सुरू असते. मात्र गेल्या दोन दिवसापासून वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शिक्षण बांधकाम तसेच पाणीपुरवठा विभागाचे ऑनलाइन तसेच इतर शासकीय कामांमध्ये खोडा झाला आहे. विजेअभावी कार्यालयातील संगणक, पंखे तसेच बल्ब बंद अवस्थेत असल्यामुळे पंचायत समितीतील कर्मचाऱ्यांना ऑफिसमधील अंधारात बसून काम करणे अवघड झाले आहे .सोबतच पंचायत समितीच्या शबरी, घरकुल योजना तसेच शिक्षण विभागाच्या विविध योजनांचा कामकाजाचा बाबतीतही अडचण निर्माण झाली असून महावितरणकडून पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचा विद्युत पुरवठा त्वरित सुरू करण्याची मागणी केली जात आहे.








