तळोदा | प्रतिनिधी
धवळीविहीर (रोझवा प्लाँट) ता.तळोदा येथील आरोग्य उपकेंद्र इमारतीचे निकृष्ट बांधकाम बंद करुन चौकशी करण्याबाबतचे निवेदन धवळीविहीर ग्रामस्थांतर्फे गटविकास अधिकारी तळोदा यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, मौजे धवळीविहीर (रोझवा प्लाँट) ता.तळोदा येथील आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम सुरू आहे. सदर कामाची पाहणी केली असता मधून केलेल्या स्लॅबला तडे पडलेले आहेत. केलेल्या बांधकामाला तडे पडल्याने या इमारतीचे आयुष्य नक्कीच कमी होणार आहे. तळाला बसविण्यात येणारी फरशी व भिंत यांच्यात अंतर आहे. तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या पद्धतीने फरशी बसवत असल्याने आजच फरशी हालते व फुटते त्यामुळे ती जास्त काळ टिकणार नाही.
लाखो रुपये खर्च करूनही निकृष्ट बांधकाम होत आहे ही शासनाची व जनतेची फसवणूक आहे. इंजिनियर यांना ही बाब सांगितली असता काम बरोबर आहे असे त्यांचे मत आहे. परंतू या संपूर्ण बांधकामात इंजिनियरने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. लाल विटा ऐवजी सिमेंट विटा वापरली आहे. जिन्याच्या स्लॅबला पत्रे लावले असल्याने सदर इमारत कच्ची आहे.
तरी या इमारतीच्या दर्जाची तपासणी करून आवश्यक बदल करण्याची कार्यवाही करावी ही विनंती. या अर्जाची दखल न घेतल्यास आंदोलन करण्यात येईल. यास प्रशासन जबाबदार राहील. तसेच इंजिनियर यांनी अशा बांधकामाची किती वेळा तपासणी केली याची ही माहिती मिळावी. अंदाजपत्रकाप्रमाणे काम झाले आहे किंवा नाही याची ही चौकशी करावी. ही विनंती.
तरी कृपया आरोग्य उपकेंद्र इमारत धवळीविहीर (रोझवा प्लाँट) च्या बांधकामाची चौकशी करावी व न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन धवळीविहीर ग्रामस्थांतर्फे गटविकास अधिकारी तळोदा यांना देण्यात आले.
या निवेदनावर दारासिंग वसावे, बिपिन पावरा, प्रकाश पावरा, विजयसिंग पावरा, मनिलाल पावरा, मुकेश डुडवे, चेतन पावरा, रतिलाल पावरा, सुकलाल पावरा, नटवर पावरा, दिनेश पावरा, किरण पावरा, उदेसिंग पावरा, निलेश पावरा, विजयसिंग पावरा, दिलवर पावरा, सोमलाल पावरा, किसन पावरा, श्याम पावरा, नरेंद्र पावरा, अजित पावरा, ओमप्रकाश पावरा असे ८२ ग्रामस्थांच्या सह्या आहेत.








