जिल्हा पोलीस दलातर्फे राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत जिल्हयातील ४१ मद्यपि वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांचे वाहन परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्यातर्फे सांगण्यात आले.
मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी रस्ते अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असुन रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येमध्ये देखील वाढ होत आहे. ही बाब चिंताजनक असल्यामुळे दारु पिऊन वाहन चालविणार्या चालकांविरुध्द् नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
दि.२४ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत चारचाकी व दुचाकी मोटारसायकल चालकांची अचानक तपासणी केली असता काही वाहन चालकांनी मद्यपान केलेले आढळुन आले. त्यामुळे त्यांच्याविरुध्द वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने नवापूर पोलीस ठाणे ७, शहादा पोलीस ठाणे ५, शहर वाहतुक शाखा नंदुरबार ५, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे ४, नंदुरबार शहर पोलीस ठाणे ४, धडगांव पोलीस ठाणे ४, अक्कलकुवा पोलीस ठाणे ३, विसरवाडी पोलीस ठाणे २, सारंगखेडा पोलीस ठाणे २, तळोदा पोलीस ठाणे २. उपनगर पोलीस ठाणे २, मोलगी पोलीस ठाणे १ म्हसावद पोलीस ठाणे १ असे एकुण ४२ गुन्हे मद्यपी चालकांवर नोंदविण्यात आले. तसेच त्यांचे लायसन्स देखील रद्द करण्याची प्रक्रीया करण्यात येणार आहे.
याशिवाय आगामी सण उत्सवाच्या काळात देखील नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत अचानक दुचाकी व चारचाकी वाहन चालकांची तपासणी करुन दारु पिऊन वाहन चालवितांना आढळुन आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी दिला आहे.
दरम्यान, दारु पिऊन कोणीही वाहन चालवू नये, दारु पिऊन वाहन चालविणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांसाठी देखील धोकेदायक आहे. नागरीकांनी त्यांच्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळावे. तसेच कोणीही मद्यपान करुन वाहन चालवू नये, असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे मद्यपि वाहनचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.