नंदुरबार l प्रतिनिधी-
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीतील उत्तर महाराष्ट्र प्रदेश सहसंपर्क प्रमुख म्हणून गोसेवक केतन रघुवंशी यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी या नियुक्तीचे पत्र दिले आहे.
केतन दिलिपसिंह रघुवंशी हे प्रखर हिंदूप्रेमी आणि धाडसी हिंदू सेवक म्हणून सर्वांना परिचित आहेत. ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या व संसद रत्न माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पक्षात ते अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. पक्षाच्या प्रत्येक उपक्रमात त्यांचा उल्लेखनीय सहभाग असतो.
तत्पूर्वी त्यांनी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या माध्यमातून देखील कार्य केले आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे ते काही काळ जिल्हा अध्यक्ष होते. नंतर भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव पदावर देखील कार्यरत राहिले. या दरम्यान, कोरोना महामारीच्या काळात अनेक दिवस गरिबांना अन्नदान करण्याचा उपक्रम राबवणे, रघुवंशी समाज संघटनेच्या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करणे,
शैक्षणिक सहाय्य मिळवून देणे तसेच धार्मिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग घेणे, या स्वरूपाचे कार्य करीत आले आहेत. पक्षीय उपक्रम आणि सामाजिक कार्य लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टी कडून आता भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र सह संपर्कप्रमुख पद देण्यात आले आहे. या निवडी बद्दल पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी तसेच शहरातील चाहते यांच्याकडून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.









