नंदुरबार l प्रतिनिधी-
भारताचे पहिले उपपंतप्रधान ‘लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त तसेच त्यांच्या कार्याचे स्मरण म्हणून राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा करण्यासाठी नंदुरबार येथे आज दिनांक 31 ऑक्टोबर 2026 रोजी गुजर लेवा पाटीदार पटेल समाजाच्या वतीने एकतेचा संदेश देण्यासाठी भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासह भारत माता, स्वर्गीय माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, सरकार महर्षी माजी आमदार अण्णासाहेब पिके पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉ. हिना गावित, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते करण्यात आले.
नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी एकता रॅलीला हिरवी झेंडी दाखवली. अखिल भारतीय गुजर समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजीत मोरे, शहादा पालिकेच्या उपनगराध्यक्ष सौ माधवी पाटील, प्राध्यापक मकरंद पाटील, शितल पटेल, माजी नगरसेवक ज्योती पाटील यांच्यासह गुजर समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.
मिरवणुकीत सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेल्या कार्याचे फलक झळकवण्यात आले. सरदार वल्लभ भाई यांचा भव्य पुतळा ठेवलेला रथ, तत्सम आकर्षक देखावे, विविध घोषवाक्ये आणि त्यांच्या जीवनकार्याची माहिती देणारे फलक हे या मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले. नंदुरबार शहरातील गिरीविहार गेट परिसरातून सुरु झालेली रॅली नंदुरबार शहरातील उड्डाणपूल मार्गे, गांधी पुतळा, नेहरू पुतळा, जुनी नगरपालिका, नवी नगरपालिका, अंधारे चौक मार्गे डॉक्टर काणे हायस्कूल या ठिकाणी संपन्न झाली. यावेळी नंदुरबार शहरातील हुतात्मा उद्यान या ठिकाणी असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अर्ध पुतळ्यास डॉक्टर हिनाताई यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.







