माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात
नंदुरबार l प्रतिनिधी-
खोकराळे , ता. नंदुरबार येथील का. वि. प्र. संस्था, भालेर संचलित माध्यमिक विद्यालय, खोकराळे येथे भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवस आणि हात धुवा दिवस विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील यांच्या प्रेरणेने, कार्याध्यक्ष विजय बोरसे आणि उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी. एस. सूर्यवंशी होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक जी. एस. मन्सुरी, ए. बी. पाटील, एस. व्ही. पाटील आणि श्रीमती एम. आर. पाटील उपस्थित होते.
वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांची वैचारिक क्षमता विकसित व्हावी आणि पुस्तकांशी मैत्री दृढ व्हावी, या उद्देशाने वर्गनिहाय विद्यार्थ्यांना आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली.
इयत्ता पाचवी ते सातवी या लहान गटातून चिरंजीव वेदांत धनगर, अविनाश धनगर आणि भावेश धनगर यांनी, तर इयत्ता आठवी ते दहावी या मोठ्या गटातून कु. जान्हवा धनगर, कु. तोष्णवी धनगर आणि कु. दीपाली धनगर यांनी वाचनाचे महत्त्व, पुस्तकांमधून मिळणारे ज्ञान आणि डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनाविषयी आपले विचार मांडले.
श्री. सूर्यवंशी यांनी शाळेत वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी ‘माझे मत, माझे पुस्तक’, ‘वाचन कट्टा’ आणि ‘वाचन संकल्प भिंत’ हे तीन उपक्रम एकत्रितपणे राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.
यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, “डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जीवन आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही कठीण असली, तरी जिद्द, चिकाटी, शिस्त आणि आत्मविश्वास यांच्या बळावर आपण आपले ध्येय साध्य करू शकतो. प्रत्येकाने आपल्या जीवनात एक निश्चित ध्येय ठेवले पाहिजे आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग कुटुंब, समाज व देशाच्या प्रगतीसाठी केला पाहिजे.”
पुढे त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे, त्यासाठी सातत्याने मेहनत करण्याचे आणि जबाबदार नागरिक बनून विकसित भारताच्या निर्मितीत योगदान देण्याचे आवाहन केले.
या उपक्रमांतर्गत शिक्षक व विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे पुस्तक निवडून त्याचे वीस मिनिटे वाचन करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्या पुस्तकाविषयी चार ओळींत अभिप्राय लिहिण्याची कृती घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात आनंदाने सहभाग घेतला. या माध्यमातून वाचनाची सवय, आकलनशक्ती आणि स्वतःचे विचार लेखी स्वरूपात व्यक्त करण्याची क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
हात धुवा दिवसानिमित्त स्वच्छतेचे प्रात्यक्षिक
वाचन प्रेरणा दिवसासोबतच हात धुवा दिवसही उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन एस. बी. बागुल यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले








