के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
नंदुरबार l प्रतिनिधी-
पथराई ता. नंदुरबार येथील के.डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, ज्ञानाची व्याप्ती वाढावी आणि वाचनातून समृद्ध व्यक्तिमत्त्व घडावे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शरद पाटील होते, तर प्रल्हाद संदानशिव आणि ग्रंथपाल रवींद्र पाडवी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी श्री. संदानशिव यांनी आपल्या मनोगतात वाचनाचे महत्त्व विशद केले. वाचनामुळे माणसाच्या विचारांत आणि व्यक्तिमत्त्वात सकारात्मक व उच्च दर्जाचे बदल घडून येतात. त्यामुळे प्रत्येकाने नियमित वाचनाची सवय जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणातून प्राचार्य श्री. पाटील यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंगांचा दाखला देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जीवनात यशस्वी होण्यासाठी ज्ञानाची कास धरणे आवश्यक असून, वैचारिकदृष्ट्या समृद्ध आणि प्रगल्भ जीवन जगण्यासाठी वाचन महत्त्वाची भूमिका बजावते, असे त्यांनी सांगितले.
त्यानंतर,,’ एक तास -वाचनाचा ‘ या उपक्रमांतर्गत इयत्तेनुसार विद्यार्थ्यांनी वाचन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विकास पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन संदीप ईशी व विकास पाटील यांनी केले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.








