नंदुरबार l प्रतिनिधी
नगरपरिषद हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांच्या रुंदीकरणात विकास आराखड्यांचे उल्लंघन आणि नागरी सुविधांच्या अभाव होत आहे. पालिकेच्या नगररचना व अभियांत्रिकी विभागासोबत संयुक्त मोजणी करून भविष्यातील शहराच्या सुनियोजित विकासासाठी स्थानिक विकास आराखड्याला अनुसरून कामे करावीत अन्यथा रस्त्यांची कामे तात्काळ थांबविण्यात येतील असा इशारा शिवसेनेचे नेते,आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी आ.आमश्या पाडवी,जिल्हाधिकारी डॉ.मिताली शेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पालवे, बैठकीच्या सुरुवातीला आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागातील अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले.ते म्हणाले, नगरपरिषद क्षेत्रांतर्गत राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत विविध रस्त्यांची कामे परस्पर सुरू आहेत. या कामा संदर्भात राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून नगररचना विभाग किंवा नगर परिषदेची कोणतीही पूर्वकल्पना माहिती किंवा चर्चा केलेली नाही. जरी सदर रस्त्यांची मालकी थेट राष्ट्रीय महामार्गाकडे असली तरी नगरपालिकेच्या मंजूर विकास योजना व नियमानुसार सदर रस्त्यांची कामे करणे बंधनकारक व आवश्यक आहेत.
आपत्कालीन व्यवस्थापनात अडचणी
नगरपरिषद हद्दीत कोणतीही विकास कामे करताना स्थानिक प्रशासनाला विश्वासात घेणे बंधनकारक असताना राष्ट्रीय महामार्ग विभागाने कोणतीही पूर्वपरवानगी किंवा समन्वय न ठेवल्यामुळे आपत्कालीन व्यवस्थापनात अडचणी निर्माण येत असल्याचे आ.रघुवंशींनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
गंभीर समस्यांना सामोरे जाणे लागणार
यावेळी नागरी समस्यांवर हात घालताना आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले,रस्त्यांच्या परस्पर सुरू असलेल्या कामांमुळे नगरपालिकेच्या अस्तित्वातील पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन ड्रेनेज लाईन तसेच विजेचे पोल आणि भूमिगत केबल यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भविष्यात नागरिकांना पिण्याच्या पुरवठ्यात खंड पडणे. ड्रेनेज तुंबणे किंवा वीज पुरवठा खंडित होण्यासारखा गंभीर समस्यांना सामोरे जाणे लागणार आहे.
ही केली प्रमुख मागणी
राष्ट्रीय महामार्ग विभाग व पालिका प्रशासनाची समन्वय बैठक घ्यावी.
स्थानिक विकास आराखड्याला बांधील राहूनच पालिकेच्या पूर्वपरवानगीनेच कामे हाती घ्यावी.
नागरी सुविधांच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने तांत्रिक व आर्थिक तजवीज करावी.







