शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षण परिषद
नंदुरबार l प्रतिनिधी-
भालेर येथील का. वि. प्र. सं. संचलित श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात केंद्रांतर्गत सप्टेंबर महिन्याची शिक्षण परिषद उत्साहात झाली.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शैक्षणिक गुणवत्तावाढ आणि शासनाच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यावर परिषदेत मार्गदर्शन करण्यात आले.
परिषदेच्या अध्यक्षस्थानी भालेरच्या सरपंच कविता पाटील होत्या. शिक्षण विस्तार अधिकारी मंगेश निकुंभ, केंद्रप्रमुख हिरालाल शिंपी, चतुर पाटील, प्राचार्य एस. जी. सैंदाणे, पर्यवेक्षक पी. डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना निकुंभ यांनी विद्यार्थ्यांच्या अध्ययन गरजा ओळखून कृतीआधारित, अनुभवाधारित व विद्यार्थी-केंद्रित अध्यापन करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांची उपस्थिती, अध्ययनातील अडचणींचे निदान, अध्ययन निष्पत्ती, शैक्षणिक प्रगतीचे मूल्यमापन आणि आवश्यक पूरक अध्यापनावर त्यांनी भर दिला. शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी तसेच गुणवंत व अध्ययनात मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र नियोजन करण्याबाबतही सूचना देण्यात आल्या.
UDISE Plus, संचमान्यता, SSVR नोंदणी, आधार व APAAR व्हॅलिडेशन, PM-POSHAN, शालेय अभिलेख अद्ययावत करणे आदी प्रशासकीय बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आरोग्य तपासणी, स्वच्छता, शिक्षक-पालक सभा, वाचन संस्कृती आणि पालकांचा शैक्षणिक प्रक्रियेतील सहभाग यांचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले.
Khan Academyद्वारे डिजिटल अध्ययन, सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती, मानव विकास मिशनअंतर्गत सायकल वाटप, नवभारत साक्षरता अभियान, ‘एक पेड माँ के नाम’ व सेवा संकल्प अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबतही माहिती देण्यात आली. सूत्रसंचालन व्ही. व्ही. ईशी यांनी केले. परिषदेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.










