नंदुरबार l प्रतिनिधी-
महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान भाजपाचे आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी नंदुरबार तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये जाऊन पीक नुकसानीची पाहणी केली. त्या प्रसंगी अनेक शेतकऱ्यांनी व्यथा मांडली असता महायुती सरकारने कोणकोणत्या सवलती जाहीर केल्या, याची माहिती देत डॉ.गावित यांनी त्या सर्वांना दिलासा दिला. भाजपाच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्यासह परिसरातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात दुष्काळ जाहीर केला असून त्या अनुषंगाने आज सकाळपासूनच राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. पावसाअभावी दुष्काळ पडलेल्या शेती पिकात कापूस भुईमूग ज्वारी मका यांचा प्रामुख्याने समावेश असून पाणी उपलब्ध नसल्याने ही पीक करपू लागली आहेत. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसान सोसावं लागत आहे. शेताच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करत अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यास सूचना करण्यात आल्या. या पाहणी दरम्यान जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित प्रांत अधिकारी बी ए कापसे, तहसीलदार संतोष डेरे, गटविकास अधिकारी वर्षा वाघमोडे, तालुका कृषी अधिकारी के ए ठाकूर यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतकरी उपस्थित होते.








