के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात
नंदुरबार l प्रतिनिधी-
पथराई ता. नंदुरबार येथील के.डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी व पालकांसाठी सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे, विश्वासाचे आणि संरक्षणाच्या भावनेचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधनाचा सण विद्यालयाच्या परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांच्या बहिणींनी आपल्या भावांचे औक्षण करून त्यांच्या मनगटावर प्रेमाची व मायेची राखी बांधली. बहिणींनी भावांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या, तर भावांनीही आपल्या बहिणींच्या सुख-समृद्धीसाठी सदैव पाठिंबा देण्याचा संकल्प केला. या प्रसंगी भाऊ-बहिणीच्या भावनिक नात्याचे सुंदर दर्शन घडले.
विद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सामूहिक रक्षाबंधनामुळे विद्यार्थी, पालक व बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
सैनिकी विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिस्त, देशप्रेमासोबतच भारतीय संस्कृती, परंपरा व कौटुंबिक मूल्यांची जाणीव व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य शरद पाटील , प्रा.विजय काळे, श्रीमती माधवी सोनवणे,अरमान पठाण,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.







