राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात
नंदूरबार l प्रतिनिधी
भालेर येथील नं. ता. वि. स. संचलित शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात रक्षाबंधन सण अत्यंत उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक राख्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधून बंधुप्रेम, स्नेह आणि परस्पर विश्वासाचा संदेश दिला.
या रक्षाबंधन सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे शाळेच्या प्रांगणातील वृक्षांना राख्या बांधून पर्यावरण रक्षणाचा अनोखा संदेश देण्यात आला. ‘वृक्षांचे रक्षण म्हणजेच पर्यावरणाचे रक्षण’ या भावनेतून विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली. रक्षाबंधनाच्या पारंपरिक उत्सवाला पर्यावरण संवर्धनाची जोड देत विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक तथा प्राचार्य आर. एच. बागुल यांनी रक्षाबंधनाचा व्यापक अर्थ स्पष्ट केला. ते म्हणाले, “रक्षाबंधनाचा संदेश केवळ भाऊ-बहिणीपुरता मर्यादित न राहता एकमेकांचा आदर करणे, परस्परांना सहकार्य करणे आणि समाजात सुरक्षित व प्रेमळ वातावरण निर्माण करणे हा आहे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. बी. पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
राखीच्या माध्यमातून बंधुप्रेमासोबतच वृक्षप्रेम आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसह उपस्थितांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.








