मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे
आवाहन
नंदुरबार l प्रतिनिधी-
दीर्घ आजारपणामुळे शारीरिक हालचालींना मर्यादा असताना सुद्धा महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकासमंत्री तथा आमदार डॉ.विजयकुमार गावित हे स्वतः बैठकीत उपस्थित राहिलेले पाहून कार्यकर्त्यांना सुखद आश्चर्याचा धक्का बसला.. आपले लाडके नेते डॉ.विजयकुमार गावित प्रत्यक्ष भाषण करून ठणठणीतपणे मार्गदर्शन करीत आहेत; हे पाहिल्यावर उपस्थित अनेक कार्यकर्त्यांना तर गहिवरून आले.. यामुळे काही क्षण सभागृहात भावनिक वातावरण बनलेले पहायला मिळाले.
नंदुरबार शहरातील हॉटेल विधान इंटरनॅशनलच्या प्रशस्त सभागृहात माजी आदिवासी विकासमंत्री तथा विद्यमान भाजपाचे आमदार डॉ.विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली व संसदरत्न माजी खासदार डॉ.हिना गावित आणि भाजप अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सुप्रिया गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत नंदुरबार विधानसभा मतदार संघातील मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR – Special Intensive Revision 2026) विषयीची आढावा बैठक पार पडली. त्यात हा प्रसंग घडला.
जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हेमलता शितोळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील, नगरपालिकेचे विरोधी गटनेते हिरालाल चौधरी माजी शहराध्यक्ष नरेश कांकरीया प्रकाशा मंडलाध्यक्ष विजय पाटील धानोरा मंडलाध्यक्ष गणेश चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी पक्षातील विविध पदांवर नियुक्ती झाल्याबद्दल संतोष वसईकर, केतन रघुवंशी, शाम मराठे,
संगिताताई जयस्वाल, सरिताताई जयस्वाल, जगदीश पाटील, प्रकाश गवळे तसेच नंदुरबार विधानसभा क्षेत्रातील मंडळ अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.नंदुरबार विधानसभा प्रमुख जगदीश पाटील यांनी नंदुरबार विधानसभा आणि अन्य सर्व बी एल ए यांनी आपापल्या गावातील बुथवर केलेल्या एस आय आर विषयीचा आढावा मांडला.
दरम्यान, आजारपणाशी दीर्घकाळ झुंज देऊन परतल्यानंतर आमदार डॉ.विजयकुमार गावित यांनी जनसंपर्क करण्याला लगेचच दमदारपणे सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. बंगल्यावर भेटीला येणाऱ्या कार्यकर्त्यांशी व पदाधिकाऱ्यांशी देखील त्यांनी नियमित संवाद सुरू केला. शनिमांडळ येथे प्रत्यक्ष जाऊन त्यांनी महाआरती केली आणि नंतर उपस्थित ग्रामस्थांशी संवाद देखील केला. ते सक्रिय झाल्याचे दर्शवणारा तो पहिला प्रसंग होता. त्यानंतर काल पार पडलेल्या आढावा बैठकीत सर्वांना पुन्हा सुखद धक्का बसला.
प्रमुख भाषणात डॉ.विजयकुमार गावित म्हणाले की, माझ्या अनुपस्थितीतही डॉ.हिनाताई यांच्या समवेत आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे कार्य सुरू ठेवले आणि विशेष काळजी घेतली त्याबद्दल सर्वांचा आभारी आहे. मतदानापासून कोणी वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी, तृटी न राहता वेगाने काम पूर्ण करावे. आपण सर्व परीश्रम करताहेत हे निश्चित कौतुकास्पदच आहे. डबल नोंदणी कोणी करणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आणि सर्व उपस्थितांना रक्षा बंधनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
प्रमुख मार्गदर्शनात संसदरत्न डॉ.हिना गावित म्हणाल्या की, एस आय आर चे आपल्या भागात 90 टक्के काम चांगले झाले आहे. आता उर्वरित काम मुदतीत पूर्ण करून सर्वात आघाडीचा मतदारसंघ म्हणून स्थान प्राप्त करूया. ऑनलाईन नोंदणी दिसणे आवश्यक आहे अन्यथा पक्षाला मुंबईत आपण शुन्य दिसतो. म्हणून आपापल्या बुथमधे काम करताना बीएलए टू, बीएलओ यांनी दक्षता घ्यावी आणि वेळेवर काम पूर्ण करावे, असेही डॉ.हिना गावित म्हणाल्या. डॉ.सुप्रिया गावित यांनी आपल्या भाषणातून तांत्रिक मुद्दे मांडले व मतदारांचे अर्ज तातडीने ऑनलाईन नोंद करणे किती गरजेचे आहे याची आवश्यकता विशद केली.
प्रसंगी नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी सदस्य, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते








