नंदुरबार l प्रतिनिधी-
आठ महिन्यांच्या आजारपणातून उठल्यानंतर महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा भाजपाचे विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सर्वात नंदुरबार तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री शनैश्वर मंदिरात जाऊन मनोभावे शनि देवाचे विधिवत पूजन केले. त्यांना असे सक्रिय झालेले पाहून मोठ्या संख्येने जमलेले ग्रामस्थ आणि कार्यकर्ते अत्यंत आनंदित व उल्हासित झालेले दिसले.
आजारपणाशी दीर्घकाळ झुंज दिल्यानंतर आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नंदुरबार येथे दाखल होताच जनसंपर्क करण्याला पुन्हा दमदारपणे सुरुवात केली असून शनिमांडळ येथील ही त्यांची पहिली भेट होती. बंगल्यावर भेटीला येणाऱ्या कार्यकर्त्यांशी व पदाधिकाऱ्यांशी देखील त्यांनी संवाद सुरू केला आहे. शनिमांडळ येथील श्री शनैश्वर मंदिरात सर्वप्रथम डॉक्टर विजयकुमार गावित, संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित तसेच भाजपाच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या हस्ते शनि देवाचे विधीवत पूजन करण्यात आले.
तसेच महाआरती करण्यात आली. त्यानंतर शनेश्वर मंदिरा समोरील मारुती मंदिराच्या सभामंडपाचे उद्घाटन करण्यात आले. आदिवासी विकास मंत्री असताना डॉक्टर विजयकुमार गावित यांनी मंजूर केलेल्या निधीतूनच या सभामंडपाचे पुनर्निर्माण करण्यात आले आहे. यादरम्यान, ट्रस्टच्या कार्यालयात बसून उपस्थित ग्रामस्थांनी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याशी संवाद केला. आपल्या मार्गदर्शक नेत्याला सक्रिय झालेले पाहून अनेकांनी जनता आपल्या सोबतच आहे; असे आश्वस्थ केले व उत्स्फूर्तपणे घोषणा देत आनंद व्यक्त केला.
त्याप्रसंगी शनैश्वर ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष दिपक पाटील, माजी जि प सदस्य भिका पाटील, माजी जि प सदस्य मुन्ना पाटील, शनिमांडळ सरपंच विनायक पाटील, माजी चेअरमन विश्वास पाटील भाईदास सावंत, वसंत खैरनार, भरत राजपूत, रमेश धोबी, चिंधू धनगर, शिवाजी पाटील, प्रभाकर पाटील, राजेंद खैरनार, भटू धनगर, प्रकाश भिल, विवेक पाटील, योगेश पवार जगदीश पाटील महेंद्र राजपूत सचिन पाटील भावराम भिल राकेश मोरे छोटू ठाकरे, विखरणचे सरपंच रोहिदास मराठे, होळचे सरपंच व्यंकट पाटील, सरपंच लोटन पाटील, नारायण राजपूत, संजय पाटील, माजी सरपंच विजय राजपूत, रनाळे सरपंच जितू ओगले, हेमंत पटेल, राहुल पाटील अक्षय पाटील आणि अन्य कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.








