नंदुरबार | प्रतिनिधी
ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांच्या विश्वासाला तडा देणाऱ्या फ्लिपकार्ट फसवणूक रॅकेटचा नंदुरबार शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश केला आहे. ग्राहकांनी मागविलेल्या नवीन वस्तू पार्सलमधून काढून त्याऐवजी जुन्या अथवा इतर वस्तू ठेवून फसवणूक करणाऱ्या तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून विक्री केलेल्या सुमारे ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात १० एलईडी टीव्ही, पॅनासोनिक कंपनीचा एसी, गिझर, मॉप सेट आणि स्मार्ट होम थिएटर यांचा समावेश आहे.
१३ जुलै रोजी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल आनंदा मराठे व राकेश मोरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, ऑनलाइन शॉपिंगमधील काही डिलिव्हरी बॉय ग्राहकांनी मागविलेल्या नवीन वस्तूंच्या ऐवजी जुन्या अथवा इतर वस्तू पार्सलमध्ये ठेवून ग्राहकांची फसवणूक करीत आहेत. या माहितीची शहानिशा करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी दिल्यानंतर गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला.
पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने संशयितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी ग्राहकांसाठी आलेल्या महागड्या वस्तू काढून त्या विक्री केल्याची बाब समोर आली. त्यानंतर विविध नागरिकांकडून आरोपींनी विक्री केलेल्या वस्तू जप्त करण्यात आल्या.
या प्रकरणात फ्लिपकार्टचे नंदुरबार येथील व्यवस्थापक आरिफ हुसेन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परवेझ मोहम्मद, सुफियान रज्जाक मणियार आणि राज विनोद मराठे (रा. नंदुरबार) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४), ३१६ (४) व ३ (५) अन्वये नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, ग्राहकांनी ऑनलाइन मागविलेल्या वस्तू पार्सलमधून काढून त्याठिकाणी त्याच प्रकारच्या जुन्या अथवा इतर वस्तू ठेवण्यात येत होत्या. त्यामुळे ग्राहकांना चुकीच्या वस्तू मिळत असल्याने त्या कंपनीकडे परत पाठवल्या जात होत्या. या प्रकारामुळे ग्राहकांसह फ्लिपकार्ट कंपनीचेही मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यापूर्वीही अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे फ्लिपकार्ट व्यवस्थापनाने पोलिसांना सांगितले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशीष कांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक भुणेश मराठे तसेच नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख करीत आहेत.
नागरिकांनो सावधान
नंदुरबार शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ऑनलाइन वस्तू स्वीकारताना शक्य असल्यास पार्सलची खात्री करून घ्यावी. तसेच बाजारभावापेक्षा अत्यल्प किमतीत मिळणाऱ्या महागड्या वस्तू खरेदी करण्याचा मोह टाळावा. अशा वस्तू चोरीच्या, अपहार केलेल्या किंवा फसवणुकीतून मिळालेल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणताही संशयास्पद व्यवहार आढळल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी.








