नंदुरबार | प्रतिनिधी
जिल्हा रुग्णालयात मानवतेला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने नवजात मुलीला जन्म दिल्यानंतर तिचे संगोपन व पालनपोषण न करता तिला रुग्णालयातच सोडून बेपत्ता झाल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
माहितीनुसार, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रकसवाडे प्राथमिक आरोग्य केंद्रातून एका गरोदर महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकारी डॉ. रिजवान शहा यांनी तपासणी केली असता ती महिला पूर्णकालीन गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. तत्काळ तिला प्रसूती कक्षात हलविण्यात आले.
दुपारी ४:१२ वाजता संबंधित महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र बाळाची प्रकृती नाजूक असल्याने तिला तातडीने विशेष नवजात निगा विभागात (एनआयसीयू) दाखल करण्यात आले. आईला पुढील उपचारासाठी वेगळ्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते.
६ फेब्रुवारी रोजी सकाळी बाळाला दूध पाजण्यासाठी तिची आजी रुग्णालयात आली होती. मात्र दुपारनंतर बाळ सतत रडत असल्याने परिचारिकांनी आईचा शोध घेतला असता ती वॉर्डमध्ये आढळून आली नाही. सायंकाळपर्यंत तपास करूनही ना आईचा ना तिच्यासोबत आलेल्या नातेवाईकांचा काहीच मागमूस लागला नाही.
रात्रपाळीतील कर्मचाऱ्यांनीही संपूर्ण रुग्णालय परिसरात शोध घेतला, मात्र संबंधित महिला पूर्णतः बेपत्ता असल्याचे स्पष्ट झाले. अखेर या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, नवजात मुलगी सध्या रुग्णालयात उपचार घेत असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे समाजमन अस्वस्थ झाले असून, आईच्या या अमानुष कृत्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.








