नंदुरबार l प्रतिनिधी-
चिपलीपाडा येथे रब्बी हंगाम शेतकरी मेळावा संपन्न; तज्ज्ञांकडून आधुनिक शेतीचे मार्गदर्शन
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नीत शासकीय कृषी महाविद्यालय, नंदुरबार यांच्या ‘ग्रामीण कृषी कार्यानुभव व कृषी उद्योग संलग्न’ (RAWE) उपक्रमांतर्गत मौजे चिपलीपाडा येथे भव्य शेतकरी मेळावा आणि मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. बुधवार, २१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन धुळे जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ. नितीन सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून चिपलीपाडा येथील सरपंच श्रीमती सुरेखा सूर्यवंशी, तसेच श्रीमती बेबीबाई पवार (झिरणीपाडा), श्रीमती प्रभावती अहिरे (धवळीविहीर) आणि श्रीमती रंजना साबळे (भोरटीपाडा) या मान्यवर सरपंच उपस्थित होत्या. त्यांच्यासोबतच संदीप अहिरे, रोहिदास पवार, विजय चौधरी व रेगजी पवार या उपसरपंचांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले.
तज्ज्ञ मार्गदर्शन आणि अध्यक्षीय भाषण
कार्यक्रमाचे अध्यक्ष शासकीय कृषी महाविद्यालय, नंदुरबारचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. यु. बि. होले यांनी भूषवले. त्यांनी ‘रब्बी हंगाम पिकातील जैविक कीड नियंत्रण’ या विषयावर मार्गदर्शन करताना पर्यावरणापूरक शेतीचे महत्त्व पटवून दिले.
मेळाव्यात खालील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला:
• डॉ. संदीप वाघ: रब्बी पिकांवरील रोग आणि त्यांचे एकात्मिक व्यवस्थापन.
• डॉ. विजय बलसाणे: मृद संधारणातून जलसंधारण कसे साध्य करावे.
• डॉ. भगवान गुंजाळ: भविष्यातील गरजा लक्षात घेऊन शाश्वत शेतीचा अवलंब.
• श्री. विजय उत्तमराव चौरे, प्रगतीशील शेतकरी, -अनुभव कथन करून बाजारपेठेविषयी मार्गदर्शन केले
विद्यार्थ्यांचा उपक्रम
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्या मयूरी चौरे, प्रांजली पवार, गौरी जाधव, रुसिका वळवी (चिपलीपाडा) आणि स्नेहा ठाकरे, मनीषा चौरे, वैष्णवी फरदे, प्रतिक्षा गवळी, सेजल पवार (कैटपाडा) यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांना धवळीविहीर, भोरटीपाडा आणि झिरणीपाडा येथील कृषिदूतांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे नियोजन समन्वयक डॉ. दिनेश सूर्यवंशी आणि चेअरमन प्रा. साहेबराव पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या मेळाव्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी उपयुक्त तांत्रिक माहिती मिळाली, ज्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.








